पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या दोन सराईत भामट्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० लाखांचे २० तोळे सोने जप्त करण्यात आले असून…
पाथर्डी फाटा ते ओझर थरारक पाठलाग
शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची लूट केली जात होती. अनेकांचे सोने या चोरट्यांनी लुटल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पाथर्डी फाटा परिसरात पोलीस कॉन्स्टेबल मयूर पवार पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन संशयितांवर संशय बळावला. त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीनुसार त्यांचा पाठलाग सुरू केला. हा सर्व थरार सिनेमातील एखाद्या दृश्याप्रमाणे मुंबई-आग्रा हायवेवर सुरू होता. अखेर अंबड पोलिसांनी या दोघा सराईतांना ओझर येथे अडवले. या दरम्यान संशयित आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली, मात्र पोलिसांनी शिताफीने दोघांना अटक केली.
गुन्ह्यांची कबुली आणि मुद्देमाल जप्त
अमजद अली अकबर अली आणि फैयाज इम्तियाज अन्सारी (रा. भिवंडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोन्ही सराईतांनी लुटीची पद्धत आणि केलेल्या गुन्ह्यांची उकल केली. या दोघांनी नाशिक शहर परिसरात ४२, नाशिक ग्रामीणमध्ये १०, धुळ्यात १० आणि कर्नाटक राज्यात १ असे पोलीस बतावणी करून लूट केल्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १० गुन्ह्यांमधील तब्बल २० तोळे (२०० ग्रॅम) सोने, असा एकूण ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची पहिली मोठी कारवाई, VSR च्या 4 विमानांच्या उड्डाणावर बंदी
गुंगारा देण्याची पद्धत
पोलिसांकडून त्यांच्या आणखी ४ साथीदारांची माहिती समोर आली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या सराईतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेले सराईत शहरात गुन्हे करून मालेगाव येथील गजबजलेल्या भागात वास्तव्यास राहत होते. शहरातून गुन्हे केल्यानंतर ते मालेगाव येथील भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात जात आणि तिथे वेशभूषा बदलून पुन्हा मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Ambadas Danve : ‘ड्रायव्हरच्या नावे 1150 कोटी रुपये हडपण्याचा भुमरेंचा डाव’; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
मोठ्या टोळीचा संशय
येत्या काळात या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यामागे एखादी मोठी टोळी सक्रिय असावी, असा संशय पोलिसांना असून त्या दिशेने आता नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
