• Thu. Mar 19th, 2026
    Raj Thackeray Japan Girl : ‘या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद!’ राज ठाकरेंनी मानले तरुणीचे आभार, पण का?

    Raj Thackeray on Japanese Girl Video : राज ठाकरे यांनी आपल्या एक्सवर (X) एका जपानी तरुणीचा व्हिडिओ पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.

    राज ठाकरे ऑन जपानी मुलगी व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : जपानमधल्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ती या व्हिडिओमध्ये मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ती रोज एक नवीन मराठी शब्द शिकत असल्याचं व्हिडिओमध्ये सांगत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर (X) या तरुणीचा व्हिडिओ पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे. ख्रिस मार्टिन असं त्या तरुणीचं नाव आहे. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा ‘मराठी’ आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत’, असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    राज ठाकरेंची एक्स (X) पोस्ट

    एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा ‘मराठी’ आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.

    मुंबईची भाषा मराठी

    मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरात जेव्हा जेव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे, त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही? माहित नाही.
    Maharashtra TimesBJP News: पडळकर, उपाध्येंवर मोठी जबाबदारी, कृष्णराज महाडिकांनाही संयमाचं फळ; भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर

    इथल्या मूठभर स्वकीयांना…

    मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की, या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते, त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो… माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा