• Fri. Sep 11th, 2026

पुण्यात आगीचे रौद्र रुप! गोवऱ्यांमुळे भडका

ByMH LIVE NEWS

Feb 24, 2026
पुण्यात आगीचे रौद्र रुप! गोवऱ्यांमुळे भडका
 येरवडा
येरवडा जेल रस्त्यावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत उभारलेल्या वाहनांना सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. दुचाकी वाहनांच्या टाकीतील पेट्रोल आणि ऑइलच्या भडक्यामुळे हवेत आगीचे उंच लोट दिसत होते. पन्नासहून अधिक दुचीकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, तर २०हून अधिक चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये काही सरकारी वाहनांचाही समावेश आहे. वाहनांच्या आजुबाजूला गोवऱ्या थापल्याने आग वेगाने वाढली.
येरवड्यातील सरकारी बंगला क्रमांक पाचमध्ये भूमी अभिलेखचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारील मोकळ्या जागेत दुचाकी आणि एकावर एक चारचाकी वाहने लावण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडली आहेत. त्यामुळे काही स्थानिक गोठाचालकांनी भंगारात टाकलेल्या या वाहनांच्या आजूबाजूला गोवऱ्या थापून ठेवल्या आहेत.

दुचाकी वाहनांच्या टाकीतील पेट्रोल, ऑइल आणि जमिनीवर थापलेल्या शेकडो गोवऱ्यांमुळे आग वेगाने वाढली. त्यामुळे आगीचे लोट दोन किलोमीटरपर्यंत उंच गेले होते. येरवड्यापाठोपाठ नायडू आणि धानोरी अग्निशमन केंद्रांच्या वाहनांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत पन्नासहून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाली. अग्निशमन अधिकारी सोपानदेव पवार आणि जवानांनी आग आटोक्यात आणली.वाहने नेमकी कोणाची?
आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या वाहनांमध्ये काही ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेली चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे ही वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आणि जप्त केलेली वाहने असल्याचा कयास होता; पण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वाहने विभागाची नसल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी येरवडा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग लागलेली वाहने विभागाची नसल्याचे सांगून निघून गेले. त्यामुळे आगीत नुकसान झालेली वाहने नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजूनही त्या ठिकाणी जप्त केलेल्या रिक्षा लावलेल्या आहेत. संबंधित विभागांनी लावलेली वाहने तातडीने काढून घ्यावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed