• Fri. Mar 6th, 2026
    Nanded News: तोंडाशी आलेला घास हिरावला, नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार, बळीराजाची चिंता वाढली

    हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन काढणीच्या टप्प्यात असलेल्या हरभरा, गहू आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले असून…

    नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा, रब्बी पिके धोक्यात.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड : नांदेड जिल्हा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत असून, हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. किनवट तालुक्यात आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

    रब्बी पिके संकटात

    रविवारी रात्री १० वाजताही पावसाने तडाखा दिला होता. त्यानंतप पावसाने सोमवारीही सायंकाळी ४ वाजता अधिक जोरासह परत हजेरी लावली. सध्या किनवट तालुक्यात हरभरा काढणीचा हंगाम ऐन जोमात आहे, तर गहू, ज्वारी आणि मका ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्यासोबतच, शेतात कापून ठेवलेला हरभरा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आता २३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

    कृषी विभागाने दिला इशारा

    गारपीट झाल्यास हरभऱ्याचे घाटे झडण्याची आणि ओलाव्यामुळे गव्हाचे दाणे काळवंडण्याची शक्यता आहे. वाढीच्या टप्प्यातील मका पिकात पाणी साचल्यास खोड आडवे पडणे आणि पिकांवरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना आता निसर्गाच्या कोपामुळे पिकांच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे.

    Maharashtra TimesSupreme Court OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा पेच कायम; 22 जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवरच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

    प्रशासनाचे आवाहन

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढलेला शेतमाल सुरक्षित स्थळी हलविणे, ताडपत्रीचा वापर करणे आणि तातडीने काढणी पूर्ण करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, समाजमाध्यमांवरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान अंदाजाचे पालन करण्याचे सुचविले आहे.

    Maharashtra TimesDevendra Fadanvis: मैत्री, कर्तव्य, शब्दाचे पक्के अन् शेवटची पावणेतीन तासांची भेट; अजित पवारांबद्दल अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस भरभरून बोलले

    वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे हवामान अजूनही अस्थिर आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता किनवट तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून जोर धरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा