• Fri. Mar 6th, 2026

    आमदारपुत्राला लॉटरी, तिकीट कापलेल्या दोघांना मोठी संधी; भाईंच्या ‘स्वीकृत’ खेळीनं भलभले चकित

    आमदारपुत्राला लॉटरी, तिकीट कापलेल्या दोघांना मोठी संधी; भाईंच्या ‘स्वीकृत’ खेळीनं भलभले चकित

    BMC Politics: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत तिकीट वाटप सुरु असताना मागाठाणे मतदारसंघात येणाऱ्या प्रभागांमध्ये महाघोळ पाहायला मिळाला होता. हा घोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मुंबई महापालिकेत बहुमत मिळालं. शिवसेनेच्या मदतीनं भाजपनं मुंबईत सत्ता स्थापन केली. भाजपच्या वाट्याला महापौरपद, तरी शिंदेसेनेच्या वाट्याला उपमहापौरपद आलं. यानंतर आता शिंदेसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नावं निश्चित झाली आहेत. शिंदेसेनेनं महापालिका निवडणुकीत २९ जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या वाट्याला २ स्वीकृत नगरसेवकपदं आली आहेत.

    महापालिकेत सत्ता आल्यावर विविध समित्या, स्वीकृत नगरसेवक पदांसाठी लॉबिंग सुरु झाली. स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळावी यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरु केले. सेनेच्या वाट्याला गेलेली दोन्ही स्वीकृत नगरसेवकपदं मागाठाणे विधानसभा मतदारसंघात गेली आहेत. माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि मागाठाण्याचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागल्याचं कळतं. एकाच मतदारसंघात दोन्ही स्वीकृत नगरसेवकपदं देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

    मागाठाणे मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४ आणि ५ मध्ये जागावाटपात सर्वाधिक घोळ झाला. प्रभाग क्रमांक ५ साठी शिंदेसेनेकडून राज सुर्वे यांच्यासह माजी नगरसेवक संजय घाडी (विद्यमान उपमहापौर) आग्रही होते. तर याच प्रभागासाठी विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांचे प्रयत्न सुरु होते. दरेकरांना त्यांचे बंधू प्रकाश यांच्यासाठी या प्रभागातून उमेदवारी हवी होती. यावरुन बराच खल झाला.

    चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यावर प्रभाग क्रमांक ५ मधून राज सुर्वे यांची उमेदवारी निश्चित झाली. तर संजय घाडी यांना प्रभाग क्रमांक ४ देण्यात आला. प्रकाश दरेकर यांना प्रभाग क्रमांक ३ मधून संधी दिली गेली. दरेकर यांच्यासाठी सेनेचे माजी नगरसेवक असलेल्या बाळकृष्ण ब्रीद यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे ते नाराज झाले.

    राज सुर्वे यांना ५ मधून तिकीट देण्यात आलं. त्यामुळे संजय घाडी प्रचंड नाराज झाले. घाडी यांनी प्रभाग क्रमांक ५ मधून तयारी सुरु केली होती. तर दुसरीकडे घाडी यांना ४ मधून उमेदवारी निश्चित होत असल्याचं समजताच तिथून लढण्यास उत्सुक असलेल्या मंगेश पांगारे यांनी थेट अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली. त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या सगळ्याची दखल नेतृत्त्वानं केली.

    मागाठाण्यातील महागोंधळ नेतृत्त्वाच्या हस्तक्षेपामुळे संपला. संजय घाडी यांना प्रभाग क्रमांक ४ ऐवजी ५ मधून संधी देण्यात आली. त्यांच्या जागी ४ मधून पांगारे यांना तिकीट देण्यात आलं. या सगळ्यात राज सुर्वे यांचं तिकीट कापण्यात आलं. यामुळे आमदार प्रकाश सुर्वे काही दिवस नॉट रिचेबल झाल्याची चर्चा रंगली. ते नाराज असल्याचं बोललं गेलं. अखेर आता त्यांचे पुत्र राज सुर्वे यांना पक्षानं स्वीकृत नगरसेवकपद दिलं आहे. सोबतच दरेकर यांच्यामुळे तिकीट कापण्यात आलेल्या ब्रीद यांनाही पक्षानं संधी दिली आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा