दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना मंत्री आदिती तटकरे या प्रचंड भावूक झाल्या. त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह सुन्न झालं. त्यांचे प्रत्येक शब्द सुन्न करणारे होते.
“मला आठवतं 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली. त्यादिवशी जे गुलाबी रंगाचं जॅकेट त्यांनी घातलं होतं, खरंतर तो रंग त्यांचा आवडीचा असं नाही. पण ते जॅकेट घाललं, त्यानंतर आमच्या आग्रहाखातर तशे 12 जॅकेट शिवून घेतले. त्या जॅकेटवर ते आमच्या प्रचारासाठी यायचे”, अशी आठवण आदिती तटकरे यांनी सांगितली.
आदिती तटकरे काय-काय म्हणाल्या?
“सुनेत्रा काकूंच्या रुपाने आम्ही अजित दादांना पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांची जागा ही कधी कुणी भरुन काढणार नाही. कारण जरासे जरी रागावले, ओरडले तरी वडिलांसारखे रागावले असं वाटायचं. अनेकांनी त्याचा उल्लेख केला. ते थोडं ओरडून बोलले म्हणजे आपलं काम झालं किंवा आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी ते बोलत आहेत. आम्हाला कधी त्याबद्दल वाईट वाटायचं नाही. याउलट आम्हाला आनंद वाटायचा की, ते बोलले म्हणजे मी जवळची आहे, जवळचा आहे, अशा भावना आमच्या सर्वांच्या असायच्या”, असं आदिती म्हणाल्या.
“अजित दादांवर आमचा सर्वांचा इतका विश्वास होता की, लोकसभेचा पराभव झाला तरी आमच्यातील कोण सुटलं नाही. ठिक आहे, एखाद्या निवडणुकीत पराभव होत असतो. पण तितक्याच ताकदीने आम्ही सर्वजण उभे राहिलो. कारण त्या नेतृत्वावर, त्या व्यक्तीवर आमचा विश्वास होता. आजही आमचा विश्वास आहे, ते जिथे कुठे असतील त्यांचं बारकाईने आमच्या सर्वांवर लक्ष आहे. त्यांच्या आमच्याकडून हीच अपेक्षा असणार आहे की, आपण सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघात काम करावं. या सभागृहात त्यांनी अनेकदा उल्लेख केला की, आपण एकटे इथे उभे नसतो, आपण साडे तीन ते पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे आपण जबाबदारीने इथे वागलं पाहिजे. आमच्या सगळ्यांकडूनही त्यांच्या त्याच अपेक्षा राहणार. आमचा तोच प्रयत्न राहील. ज्या अपेक्षा त्यांनी ठेवल्या त्या आमच्याकडून पूर्ण करता याव्यात”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
“मी माझ्या भगवंताला आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करेन की, ते जिथे कुठे असतील तुझ्यापाशी तिथलं उज्ज्वल स्थान त्यांना दे. आमच्या सगळ्यांच्या मनाच्या भावना तू त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद, क्षमता आणि पाठबळ आम्ही सर्वजण मिळून सुनेत्रा काकूंना देऊ. पण त्या व्यक्तीची जागा ही कुणीही भरुन काढू शकणार नाही हे दु:ख आणि खंत आमच्या सर्वांच्या मनात राहील”, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी भावना मांडल्या.
