म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत असून, मुंबईतही अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. आंदोलन होणारी संभाव्य ठिकाणे हेरून तिथे बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्यातील मंत्र्यांना, विशेषतः शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शनिवारी सर्वप्रथम आझाद मैदान परिसरात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्क येथे विरोध प्रदर्शन करण्यात आले. दादर, माहीम, मरिन ड्राइव्ह अशा वेगवेगळ्या ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले. नवी दिल्लीत सोमवारी आंदोलन चिघळल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, त्याचे मुंबईतही तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. संभाव्य आंदोलन पाहता मुंबई पोलिसांना कर्तव्यावर लवकर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखा, विशेष शाखा राजकीय नेते, संघटनाचे पदाधिकारी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. जमावबंदी आदेशाची आठवण करून देत आंदोलनांना परवानग्या नाकारल्या जात असून, अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
सोशल मीडियावर विशेष नजर
आंदोलनासाठी जमणाऱ्या तरुणांमध्ये सोशल मीडियाचा प्रभाव सर्वाधिक आहे. तिथूनच आवाहन करून आंदोलनासाठी जमवाजमव केली जात आहे. त्यामुळे पोलिसांची सोशल मीडियावर विशेष नजर आहे. वेगवेगळी महाविद्यालये, संघटना, विद्यार्थ्यांमधील नेतेमंडळी यांच्या हॅण्डलवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. कायदा-सुवस्था बिघडेल, अशा पोस्ट कुणीही टाकू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विद्यार्थी आंदोलनाचा जोर मुंबईतही
शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, सोमवारपाठोपाठ मंगळवारीही मुंबईत आंदोलन झाले. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात एकत्र येत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या आणि दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही आंदोलकांसोबत ठिय्या देऊन बसल्या होत्या.
नीट परीक्षेतील पेपरफुटीसह शिक्षण क्षेत्रातील इतर सुधारणांसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांसह हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोमवारी दिल्ली पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार करत आंदोलन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. या लाठीहल्ल्याचे पडसाद मंगळवारी मुंबईत उमटले. दिल्लीतील आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. मात्र पोलिसांनी ते मोडून काढण्यासाठी लाठीमार केला. देशात बेरोजगारीसह अनेक गंभीर प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा वापर चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया मुंबईतील आंदोलकांनी व्यक्त केली.
मुंबईत सोमवारी आझाद मैदान परिसरात आंदोलन झाल्याने पोलिसांनी या परिसरावर लक्ष केंद्रीत करत मोठा बंदोबस्त ठेवला होता. पण आंदोलकांनी मंगळवारी शिवाजी पार्क परिसरात एकत्र येत निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. आंदोलनासाठी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. त्यांनीही आंदोलकांसह ठिय्या दिला. पोलिसांनी आंदोलकांची उचलबांगडी सुरू केल्यावर त्या विरोधासाठी पुढे सरसावल्या. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने महाराष्ट्रासह देशभरात व्हायला हवीत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा