• Sun. Jun 7th, 2026
    Latur Crime : शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं, वडिलांनीच दिली पोटच्या मुलाविरोधात तक्रार

    Latur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

    लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर : शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद होत असतात. मात्र, लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड येथे भावांमधील शेतीचा वाद विकोपाला गेला आणि यामधून एका भावाने दुसऱ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी परिसरातील रामलिंग मुदगड येथे मागील चार दिवसांपूर्वी बुधवारी सकाळी गुलाब विलास खरोसे या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह शेताच्या बांधावर पडल्याचं दिसून आलं होतं. वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होता. याचा तपास करत असताना शेतीच्या वाटणीसाठी लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. कासार शिरसी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हत्येचा छडा लावला आहे.

    भावानेच दिली हत्येची कबुली

    कासार शिरसीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड व उपनिरीक्षक अजय पाटील यांची टीम विविधांगांनी तपास करत होते. पण आरोपी कोण? ते समजत नव्हतं. कोणीही काही सांगण्यास पुढे येत नव्हतं. यामुळे तपास आणखी बिकट झाला होता. यातच पोलिसांनी कुटुंबातील प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी केली. तरीही सुगावा लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह त्यांचे पथक मुदगडमध्ये ठाण मांडून होते. पोलिसांनी मयताचा भाऊ उल्हास खरोसे याची कसून चौकशी केली. आरोपी उल्हास खरोसे यानेच त्याचा मोठा भाऊ गुलाब खरोसे याची हत्या केल्याची कबुली दिली. मागच्या अनेक दिवसांपासून मयत गुलाब व त्याच्यात शेतीसाठी वाद सुरू होता. मंगळवारी रात्री गुलाब खरोसे याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. यावरून आरोपी उल्हास विलास खरोसे याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रविवारी आरोपी भाऊ उल्हास खरोसे याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    Maharashtra TimesSolapur Crime : ‘माझ्या शब्दांना मान देत नाहीस’, वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीचा माहेरहून परत येण्यास नकार; तरुणाचं टोकाचं पाऊल

    पोलिसांचं म्हणणं काय?

    आरोपी उल्हास खरोसे हा स्वतःच्याच भावाची हत्या झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यासही टाळाटाळ करत होता. त्याची अनेकवेळा कसून चौकशी करूनही तपासात तो पोलिसांना कसलेही सहकार्य करत नव्हता. त्यावरून पोलिसांना त्याच्यावरच संशय बळावला, त्या दिशेने तपास सुरू केल्यानंतर आरोपी उल्हास यानेच हत्येची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा