ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय राजकीय प्रवासाला आज 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर विशेष पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत.
सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?
“आदरणीय शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. “या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा”, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांचीदेखील खास पोस्ट
खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील खास पोस्ट लिहीली आहे. “आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सन १९६७ साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांचे जीवाभावाचे सोबती, कार्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभे राहिले. जनतेने त्यांच्यावर अलोट प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकला. या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. याबद्दल या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. धन्यवाद”, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
रोहित पवार काय म्हणाले?
आमदार रोहित पवार यांनीदेखील ट्विट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. “संसदीय कारकिर्दीच्या हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले देशातील एकमेव नेते आदरणीय पवार साहेब! साहेबांची ही ऊर्जा लाखो कार्यकर्त्यांसाठी कायम प्रेरणा देत राहो, ही सदिच्छा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
