• Sun. Mar 8th, 2026

    Police Bharti: संग्रामचं वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, १६०० मीटर धावताना अचानक कोसळला; भर मैदानात काय घडलं?

    Police Bharti: संग्रामचं वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, १६०० मीटर धावताना अचानक कोसळला; भर मैदानात काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar News: मैदानावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने त्याला उचलून प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

    संग्रामचं वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, १६०० मीटर धावताना अचानक कोसळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: अंगावर खाकी वर्दी चढवून आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी अंत झाला आहे. १६०० मीटर धावण्याची शारीरिक चाचणी सुरू असतानाच हा तरुण मैदानावर कोसळला आणि त्याची प्राणज्योत मालवली. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे भरती प्रक्रियेसाठी आलेल्या हजारो उमेदवारांमध्ये मोठी शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम धोंडीराम शिंदे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा तरुण पोलीस भरतीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता. शनिवारी सकाळी ८:१५ वाजेच्या सुमारास १६०० मीटर धावण्याची मैदानी चाचणी सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावण्यास सुरुवात केली होती, मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो धावपट्टीवरच कोसळला.

    कुटुंबाचा आधार हरपला; शारीरिक ताण की हृदयविकार?….
    संग्राम हा अत्यंत जिद्दी आणि मेहनती तरुण होता, पोलीस दलात दाखल होऊन आपल्या वृद्ध आई-वडिलांना सुख देण्याचा त्याचा निर्धार होता. त्यासाठी तो गेल्या अनेक महिन्यांपासून पहाटे उठून कठोर सराव करत होता. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. संग्रामच्या अशा अचानक जाण्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, धावताना आलेला तीव्र शारीरिक ताण किंवा हृदयविकाराचा झटका यामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा अधिकृत तपशील आणि मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येईल.

    उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण
    या घटनेनंतर भरती प्रक्रियेत काही काळ खंड पडला होता. आपल्या डोळ्यांदेखत एका सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने मैदानावर उपस्थित असलेल्या इतर उमेदवारांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांनी शारीरिक चाचणीपूर्वी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त ताण घेऊ नये, असे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा