• Fri. Mar 6th, 2026
    ठाकरे आणि शिंदेंची हातमिळवणी, अमरावतीत चमत्कार, दोन्ही शिवसेनांच्या युतीने राजकारणात चर्चांना उधाण

    Amravati News : शिवसेना-शिवसेना (उबाठा)-बसप या नव्या गटाने दिनेश बूब यांना पुढे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : राज्य पातळीवर शिवसेना आणि शिवसेना (उबाठा)तील राजकीय वाद शिगेला पोहचला असताना अमरावतीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले. बहुजन समाज पक्षाच्या साथीने दोन्ही शिवसेनेनी स्वतंत्र गटाची स्थापना करीत माजी नगरसेवक दिनेश बूब यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवडले. या अनपेक्षित युतीची अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा वाढली आहे.

    नेमकं काय घडलं?

    अमरावती महापालिकेची पहिली सभा शुक्रवारी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमहापौर सचिन भेंडे व आयुक्त सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत झाली. या सभेत आठ स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड झाली. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत मतांच्या मूल्यानुसार भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. भाजपकडून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रशांत देशपांडे आणि प्रा. संजय तिरथकर यांची वर्णी लागली. काँग्रेसने माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि अनिल अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखविला. युवा स्वाभिमान पक्षाने संजय हिंगासपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसने भोजराज काळे, तर एमआयएमने सै. मुनज्जर अली यांना संधी दिली. ठाकरे-शिंदे-बसप गटाकडून दिनेश बूब यांची निवड झाली.महापालिकेची आर्थिक सूत्रे हाती ठेवणाऱ्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची अविरोध निवड झाली. संख्याबळानुसार भाजपचे पाच सदस्य निवडले गेले. युवा स्वाभिमान पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन, राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना गटाचा एक सदस्य स्थायी समितीत दाखल झाला. भाजपने मिलिंद बांबल, पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, स्मिता सूर्यवंशी आणि विनोद तनवाईस यांना संधी दिली. युवा स्वाभिमान पक्षाचे प्रशांत वानखडे, प्रियंका पाटणे आणि दीपक साहू; काँग्रेसचे ललिता रतावा, प्रशांत महल्ले व अस्मा फिरोज खान; राष्ट्रवादीचे अविनाश मार्डीकर व मीनल सवाई; एमआयएमचे सल्लाउद्दीन इक्राममुद्दीन व नाझीम खान करीम खान तर शिवसेनेकडून मंजुषा जाधव यांचा समावेश झाला. शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट अमरावतीत एकत्र आल्याने पुढील महापालिका राजकारणात नवे समीकरण किती काळ टिकते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
    Maharashtra TimesBhiwandi Mayor : भाजपकडून नारायण चौधरींनाच आधी पसंती, रवींद्र चव्हाणांचं पत्र व्हायरल, अचानक सूत्रं फिरली अन् पक्षाने नामुष्की ओढावून घेतली

    राजकीय वर्तुळात खळबळ

    शिवसेना-शिवसेना (उबाठा)-बसप या नव्या गटाने दिनेश बूब यांना पुढे करत राजकीय वर्तुळात खळबळ उडविली. बूब यांना युवा स्वाभिमान पक्षाची साथ लाभल्याची चर्चा आहे. आमदार रवी राणा आणि बूब यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बूब यांनी प्रहारतर्फे भाजपच्या नवनीत राणा यांच्याविरोधात लढत दिली होती. पराभवानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर राणा यांनी आपला आणखी एक स्वीकृत सदस्य निवडून आणण्याची संधी असतानाही बूब यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते.

    राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट, उद्धव ठाकरेंचा जळफळाट? संजय राऊत थेटच बोलले

    ‘स्थायी’वर राष्ट्रवादीचा डोळा

    महायुतीच्या सत्ता समीकरणात भाजपकडे महापौरपद, युवा स्वाभिमान पक्षाकडे उपमहापौरपद गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीच्या सभापतिपदावर दावा केला आहे. ११ नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादीकडे निर्णायक भूमिका आहे. स्थायी समितीत महायुतीचे दहा सदस्य असल्याने सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचा मार्ग सुकर मानला जात आहे. ज्येष्ठ नगरसेवक अविनाश मार्डीकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांनी यापूर्वी चार वेळा स्थायी सभापती म्हणून काम पाहिले आहे. अनुभव, प्रशासनावर पकड आणि आर्थिक विषयांतील जाण या जोरावर मार्डीकर यांची उमेदवारी भक्कम मानली जाते. मात्र अंतिम निर्णयात भाजप-युवा स्वाभिमानची भूमिका काय राहते, याकडे लक्ष आहे.
    Maharashtra TimesMadhuri Manjrekar : शेवटच्या क्षणी BMC चं तिकीट नाकारल्याने ढसाढसा रडलेल्या, पण दीड महिन्यात ठाकरेंकडून बक्षिसी, माधुरी मांजरेकर म्हणतात…

    देशपांडेंना दिलेला शब्द पाळला

    भाजपचे अॅड. प्रशांत देशपांडे यांना स्वीकृत सदस्यपद मिळणे हीदेखील चर्चेची बाब ठरली. अमरावतीच्या पहिल्या महिला महापौर विद्या देशपांडे यांचे पुत्र असलेल्या प्रशांत देशपांडे यांना अंबापेठ प्रभागातून उमेदवारी नाकारल्यानंतर नाराजी उसळली होती. ती शमवण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वत: त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी स्वीकृत सदस्यपदाचा शब्द देण्यात आल्याची चर्चा होती. आजच्या निर्णयाने तो शब्द पाळला गेला. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोमध्ये देशपांडेंना विशेष स्थान देण्यात आले होते. त्या चर्चांवर आज औपचारिक शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा