• Sun. Jun 14th, 2026

    SSC Exam 2026 Beed: शिक्षणाचा खेळखंडोबा! वर्गखोल्या अपुऱ्या, मंडपात बसून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, बीडमध्ये पहिल्याच पेपरला गोंधळ

    SSC Exam 2026 Beed: शिक्षणाचा खेळखंडोबा! वर्गखोल्या अपुऱ्या, मंडपात बसून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, बीडमध्ये पहिल्याच पेपरला गोंधळ

    SSC Exam 2026 Beed: बीडमध्ये दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला शिक्षण विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना चक्क मंडपात बसून पेपर लिहावा लागला.

    बीड जिल्ह्यात मंडपात दहावीची परीक्षा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, बीड: बीड जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी एका केंद्रात मंडप टाकून परीक्षा घेतल्याचे समोर आले. या अनागोंदीची चर्चा राज्यभर रंगली आहे.

    बीडमधील गेवराई तालुक्यातील कुर्ला येथे आदर्श शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय आहे. येथे खासगी जागेत पाचवी ते दहावीची शाळा भरते. भाड्याच्या जागेत सहा खोल्यांत वर्ग भरतात. मात्र, शिक्षण विभागाने या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र मंजूर केले. विशेष म्हणजे, या केंद्रात यशवंत विद्यालयासह इतर तीन शाळांचे दहावीचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षार्थी बसण्यास जागा पुरत नसल्याने शाळेने चक्क लग्नासाठी टाकला जाणारा मंडप टाकून त्यात बाक टाकून पहिल्या दिवशी परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून दहावीची परीक्षा द्यावी लागली. या प्रकारावर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    Maharashtra TimesBeed Crime: ‘आता तुला सोडत नाही’; वृद्धाला चौकात मारहाण केली, व्हिडिओ काढला, सगल दोन दिवस जीवावरच उठला; एवढी दहशत…
    दरम्यान, शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी या संदर्भात माध्यमाशी संवाद साधताना सांगितले, की पुढचे पेपर इतर ठिकाणी घेण्यात येतील. या केंद्राच्या जवळ जिल्हा परिषदेची सुसज्ज इमारत आहे. ती उपलब्ध असताना कुर्ला येथील मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांनी प्रशासनाच्या समोर वर्गखोल्यांची अडचण मांडली नाही. रात्रीतून मंडप टाकण्यात आला. त्यामुळे या या संदर्भात जबाबदार असणाऱ्या विरुद्ध अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल.

    परीक्षा केंद्राच्या संचालकांवर निलंबनाची कारवाई करावी अशी सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली आहे. साबळे म्हणाले, ‘या परीक्षा केंद्रावर अतिरिक्त विद्यार्थी दिले हा केंद्र संचालकांचा दावा अयोग्य आहे.’

    Maharashtra TimesBeed Crime: ‘साहेब 20 हजार घ्या…’; तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाचखोरीच्या जाळ्यात; परळीत एसीबीचा मोठा दणका!
    वडिलांच्या निधनानंतर तिने दिली ‘परीक्षा’

    सोलापूर : दहावीचा पहिला मराठीचा पेपर… वर्षभराची मेहनत आणि मोठी स्वप्ने. मात्र, पेपरला जाण्याच्या काही तास आधीच तिच्या वडिलांचे निधन झाले. अशा परिस्थितीत खचून न जाता तिने पेपर लिहून धैर्याचे दर्शन घडवले. शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये शिकणाऱ्या धनश्री भिकाजी पवार हिच्या वडिलांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. अशा वेळी पेपर देणे शक्य आहे का, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला; पण शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने स्वतः धनश्रीच्या घरी गेले. त्यांनी कुटुंबीयांना समजावले, की आज तिने पेपर दिला नाही, तर वडिलांचे स्वप्न अपुरे राहील. त्यानंतर कुटुंबाने अंत्यविधी दोन तास पुढे ढकलला आणि धनश्रीने अतिशय धीराने पेपर लिहिला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा