• Fri. Mar 6th, 2026
    Amol Kolhe : ‘अजित दादा म्हणाले होते, छगन भुजबळ राज्यसभेवर जातील’, अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते. स्वत: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत भाष्य केलं होतं, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विलीनीकरणाचा विषय चर्चेत आला. विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी विलीनीकरणावर अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचा दावा केला. पण आता त्या चर्चांना काही अर्थ नसल्याचंदेखील म्हटलं. खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील अजित पवार यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत 14 बैठका झाल्याचं म्हटलं होतं. पण त्या चर्चांना आता काय महत्त्व राहिलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी विलीनीकरणासाठी घाई नको, असं वक्तव्य केलं आहे. यानंतर अमोल कोल्हे यांना छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

    आगामी काळात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता मविआला केवळ एक जागा निवडून आणता येणार आहे. तर महायुतीचे 6 उमेदवार जिंकून येण्याची शक्यता आहे. याच निवडणुकीबाबत अमोल कोल्हे यांनी भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

    अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

    “छगन भुजबळ हे फार मोठे नेते आहेत आणि मी त्यांचा त्रागा समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषत: जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेत नसताना, छगन भुजबळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते संसंदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आमच्यात जी काही प्राथमिक चर्चा झाली होती त्यामध्ये अजित दादांनी एकदा आम्हाला ओघाने सांगितलं होतं की, कदाचित छगन भुजबळ हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा आमची अंतर्गत झाली होती”, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे.

    “आता मात्र इतक्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता, कोट्यावधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित छगन भुजबळ हे अस्वस्थ असतील. मला कल्पना नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या चर्चेत का घेतलं नाही? हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्या विषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा