• Sun. Mar 8th, 2026

    Dhule Accident : लक्ष्मण कुटुंबासह निघालेले, पण वाटेत भरधाव ट्रकची धडक, बाप-लेकाचा करुण अंत, आई-मुलगी गंभीर

    Dhule Accident : लक्ष्मण कुटुंबासह निघालेले, पण वाटेत भरधाव ट्रकची धडक, बाप-लेकाचा करुण अंत, आई-मुलगी गंभीर

    धुळ्यात अवधान येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिला आणि तिची दीड वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अजय गर्दे, धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान गावाजवळ काळीज पिळवटून टाकणारी एक दुर्घटना घडली आहे. धुळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या लेनवर, हॉटेल मानससमोर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार लक्ष्मण निंबा गुंजाळ (वय ३५) आणि त्यांचा अवघा तीन वर्षांचा मुलगा आदित्य लक्ष्मण गुंजाळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. लक्ष्मण गुंजाळ हे आपल्या परिवारासह दुचाकीने गाणेगावकडे जात असताना अवधान गावाच्या हद्दीत काळाने त्यांच्यावर हा घाला घातला. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

    या अपघातामध्ये लक्ष्मण यांच्या पत्नी भाग्यश्री लक्ष्मण गुंजाळ (वय ३०) आणि त्यांची दीड वर्षाची चिमुकली जयश्री या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच मोहाडी नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अवधान गावाजवळ झालेल्या या अपघातानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    पालघरमध्ये भीषण अपघात, दोन महिलांचा मृत्यू

    धुळ्यातील अपघाताची घटना ताजी असतानाच पालघरमध्येही अपघाताची भीषण घटना घडली आहे. भरधाव पिकअप टेम्पोने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना पालघर पूर्वेकडील नंडोरे परिसरात घडली आहे. लता निलेश तरे (वय 45) आणि बेबी चंद्रकांत जाधव (वय 65) अशी मृत महिलांची नावे आहेत. पालघर शहरात शुक्रवारी नेहमीप्रमाणे आठवडी बाजार भरत असतो. या आठवणी बाजारात शुक्रवारची सुट्टी असल्याने लता मंगेश तरे आणि बेबी चंद्रकांत जाधव या दोघीजणी गेल्या होत्या. आठवडी बाजारातील खरेदी आणि काम आटपून या दोघीही नंडोरे येथे आपल्या घराच्या दिशेने येत होत्या. नंडोरे नजीक नवापाडा परिसरात एका भरधाव पिकअप टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो डाव्या बाजूने उजव्या बाजूला येत रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या दोन महिलांना मागून जोरदार धडक दिली.

    पिकअप टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पिकअप टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांमार्फत सुरू आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा