• Sat. Mar 7th, 2026
    Kolhapur Crime: ‘तुझ्या बहि‍णीचा कॅन्सर ठीक करतो’ म्हणत लॉजवर नेलं, औषधाच्या बहाण्याने भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार

    बहिणीचा कॅन्सर बरा करण्यासाठी घरगुती औषध देण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर हादरले आहे.

    कोल्हापुरात कॅन्सरच्या औषधाच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापुरात भोंदूगिरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे. भोंदू बाबाच्या जाळ्यामध्ये अडकून अनेक जण धनसंपत्ती गमवून बसतात. अशावेळी बऱ्याचदा महिला देखील सहजरित्या भोंदू बाबाच्या जाळ्यात येत असतात. अशीच एक घटना कोल्हापूर शहरात समोर आली आहे. बहिणीच्या कॅन्सर उपचारासाठी औषध देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एका महिलेवर अत्याचार केले आहेत. घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

    बहिणीच्या कॅन्सर उपचाराच्या आमिषाने पीडित विवाहित महिलेला लॉजमध्ये नेल्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (16 फेब्रुवारी) दुपारी घडलेल्या या घटनेची फिर्याद गुरुवारी (19 फेब्रुवारी) रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. संशयित प्रतीक मुळे पसार असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली असून, संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

    कॅन्सर औषधाच्या बहाण्याने जाळ्यात ओढलं..

    शहरातील लक्ष्मीपुरी येथील मटण मार्केटजवळील महादेव मंदिर परिसरात प्रतीक मुळे उर्फ भोंदूबाबाचा सतत वावर असतो. तेथे देव-देवतांच्या फोटोंची पूजा करून तो स्वतःला ‘देवदेवसी’ करणारा बाबा म्हणवतो. दर गुरुवारी त्याच्या ‘दर्शनासाठी’ स्थानिक नागरिक गर्दी करतात. पीडित महिलेच्या बहिणीला कॅन्सर झाल्याने तिने मुळे याला ही बाब सांगितली. संबंधित महिलेचा पती दोन दिवस परगावी गेल्याची संधी या बाबाने साधली. घरगुती औषधाने उपचार करून देईन, असे आमिष मुळेने दाखवले. औषध देण्याच्या बहाण्याने त्याने पीडित महिलेला सोमवारी दुपारी 3.30 वाजता शिवाजी पेठेत बोलावून तिला लाल रंगाच्या मोटारीत बसवले आणि कळंबा तलाव, गारगोटी रस्ता परिसरातील लॉजकडे नेले.

    Maharashtra TimesChandrapur Crime: बायको नांदत नव्हती, आई सांभाळत होती; दारुडा मुलगा जन्मदात्या आईवर तुटून पडला, माऊलीनं जागेवर जीव सोडला, कारण फक्त….

    लॉजमध्ये जबरदस्तीने अत्याचार

    लॉजच्या खोलीत नेल्यानंतर मुळेने दरवाजा बंद करून घेतला. प्रतिकार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. भेदरलेल्या महिलेनं दोन दिवस लपवून ठेवलेल्या या घटनेची माहिती पतीला परगावाहून परतल्यावर सांगितली. कुटुंबाने प्रथम करवीर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली, पण घटना जुना राजवाडा पोलिस हद्देतील असल्याने तेथे फिर्याद देण्यात आली. 33 वर्षीय पीडित महिलेची मुळे याच्याशी पूर्वीची ओळख असल्याने त्याने विश्वासाचा गैरफायदा घेतला. पीडितेचे कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत असून, ती धुण्या-भांड्याचे काम करून उदरनिर्वाह चालवते.

    पोलिस तपास वेगाने

    जुना राजवाडा पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु असून, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. संशयित मुळे महादेव मंदिरशेजारील फ्लॅटमध्ये राहतो. लाल मोटार, मोबाईल लोकेशन आदी पुराव्यांचा मागोवा घेत पोलिस पथकं रात्रीपासूनच कार्यरत आहेत. लवकरच आरोपीला अटक होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहरात भोंदूबाबांच्या अफाट कृत्यांबाबत जनआक्रोश वाढला असून, अंधश्रद्धेविरोधी मोहिमांना वेग येईल, असे मत व्यक्त होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा