• Tue. Sep 15th, 2026

किनवट नगर परिषदेच्या स्थायी समितीची बैठक संपन्न; ८४.८० लाखांच्या अंदाजपत्रकावर चर्चा

ByMH LIVE NEWS

Feb 20, 2026
किनवट नगर परिषदेच्या स्थायी समितीची बैठक संपन्न; ८४.८० लाखांच्या अंदाजपत्रकावर चर्चा

नांदेड -महेंद्र प्रधान

किनवट नगर परिषद यांच्या स्थायी समितीची पहिली महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षाची सुधारित शिल्लक रक्कम ३२,०१,८११ रुपये व सन २०२६-२७ या वर्षासाठी अंदाजित ५२,७८,४९६ रुपये असे एकूण ८४,८०,३०७ रुपयांचे अंदाजपत्रक चर्चेसाठी व शिफारशीसाठी ठेवण्यात आले.

निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा सौ. सुजाता एंड्रलवार यांनी कामकाजाला गती दिली असून ही बैठक विकासाभिमुख ठरली. शहरातील प्रलंबित व संभाव्य विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, करवसुली, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेता पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती, टँकरची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात आला. तसेच बंद असलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.

“शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे मुख्य ध्येय असून निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार कामांना आमचे प्राधान्य राहील,” असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी केले.

या बैठकीस उपनगराध्यक्ष तथा नियोजन व विकास समिती सभापती पठाण महोम्मद हसन म. नूरखान, बांधकाम सभापती श्रीराम नेम्मानीवार, पाणीपुरवठा सभापती निलोफर निसार भाटी, स्वच्छता सभापती सौ. अश्विनी आदर्श जागरलावार, महिला व बालकल्याण सभापती प्रीती धीरज नेम्मानीवार, क्रीडा व सांस्कृतिक सभापती नूरसबा शेख मुकद्दर, मुख्याधिकारी मुगाजी काकडे, कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव, करनिर्धारक मिलिंद घुले, लेखापाल चक्रपाणी कदम, लेखापरीक्षक विष्णू पुजारी तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

शहराच्या मूलभूत सुविधांच्या बळकटीसाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed