मुंबई महापालिका निवडणुकीत महापौर पदाचा ट्विस्ट काही केल्या संपताना दिसत नाही. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड झाली असली तरी त्यांना केवळ सव्वा महिनेच ही जबाबदारी मिळेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौरपदाबाबत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होत आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर आणखी वेगळी चर्चा समोर आली आहे. भाजपचा महापौर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी देखील चर्चा समोर येत आहे.
मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची बघायला मिळाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीला अतिरंजक वळण लागलं होतं. प्रत्येक पक्षाची धाकधूक वाढली होती. अशा या चुरशीच्या निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागला. 30 वर्षांपासून ठाकरेंच्या ताब्यात असणारी मुंबई महापालिका त्यांच्या हातून निसटली. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला इथे मोठं यश आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात महापौर पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळालं.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं. यानंतर काही दिवसांनी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपापल्या गटाची नोंद केली. तसेच भाजपच्या रितू तावडे या मुंबई महापालिकेच्या महापौर पदी विराजनाम झाल्या. तर संजय घाडी यांची शिवसेनेच्या उपमहापौरपदी वर्णी लागली. महापौर निवडणुकीनंतर आता याबाबतचे सर्व सस्पेन्स संपले असतील, असं वाटत असतानाच आता नवी चर्चा उदयास आली आहे.
सव्वा-सव्वा वर्षाचा फॉर्म्युला?
मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत आता महायुतीत एकमत झाल्याची नवी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत पहिले सव्वा वर्षे मुंबईचा महापौर राहणार असल्याची माहिती आहे. यानंतर पुढचे सव्वा वर्षे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर बसणार असल्याची चर्चा आता समोर आहे. विविध माध्यमांनीदेखील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. पण हे वृत्त समोर आल्यानंतर पाच वर्षे भाजपचाच महापौर असेल, असं वेगळ्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त देखील देण्यात आलं आहे. तसेच असं असेल तर जिथे शिवसेनेचा महापौर असेल तिथे भाजप सव्वा वर्षांनी दावा करेल, असंही सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त माध्यमांकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 29 जानेवारीला महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व महापालिकांमधील तिढा सुटल्याची माहिती आता समोर येत आहे. मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये महायुतीचा तिढा सुटत नसल्याने महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चेच्या मार्गातून सर्व महापालिकांचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. या बैठकीत समितींच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीत समन्वय राहावा यासाठी दोन्ही पक्षांनी समंजसपणाची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.
