Shivsena Milind Narvekar: ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर किमान पहिले 6 महिने या मार्गावरून केवळ प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी नार्वेकरांनी केली आहे.
मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी आणि वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून एप्रिल 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून, विशेषतः अवजड वाहनांमुळे घाट विभागात वारंवार कोंडी निर्माण होते. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर किमान पहिले सहा महिने फक्त प्रवासी वाहतूक या मार्गावरून सुरू करून अवजड वाहनांची वाहतूक जुन्या मार्गावरूनच सुरू ठेवण्याचा विचार करावा, असं आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सुचवलं आहे. ज्वलनशील व धोकादायक रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंक मार्गावरून कधीही प्रवेश देऊ नये, अशी मागणीही त्यांनी लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
‘सुरक्षेला प्राधान्य द्यावं’
मिसिंग लिंकबाबतच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी विनंती नार्वेकर यांनी सरकारला केली आहे.
दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्या या मागण्यांबाबत सरकार आणि प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, नार्वेकर यांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
