• Mon. Jun 15th, 2026

    काँग्रेसकडून चंद्रपुरचा बदला? भाजपमध्ये मोठी फूट, ‘सेक्युलर फ्रंट’शी घरोबा; समीकरणं फिरली

    काँग्रेसकडून चंद्रपुरचा बदला? भाजपमध्ये मोठी फूट, ‘सेक्युलर फ्रंट’शी घरोबा; समीकरणं फिरली

    Bhiwandi Politics: भिवंडीत भाजपचे २२ पैकी ९ नगरसेवक फुटले आहेत. त्यामुळे सत्ता समीकरणं एकाएकी बदलली आहेत. काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    भिवंडी: चंद्रपुरात सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेस ला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसमधील कुरबुरींचा, गटबाजीचा फायदा घेत भाजपनं ठाकरेसेनेच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. आता काँग्रेसनं चंद्रपुरचा बदला भिवंडीत घेण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे. भाजपमधील फुटीर गटानं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस प्रणित आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक ३० जागा जिंकल्या. भाजपनं २२ जागांवर यश मिळवलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी १२ जागा मिळाल्या. भिवंडी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४६ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. भाजपचा एक गट फुटलेला आहे. या गटात ९ नगरसेवक आहेत. त्यांनी काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा फुटीर गट यांंचं संख्याबळ ५० च्या पुढे जात आहे.

    भिवंडी महापालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला आहे. पण तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. भाजपच्या नगरसेवकांची गट नोंदणी झालेली आहे. त्यानंतर ९ नगरसेवक फुटले आहेत. भाजपनं महापौर पदासाठी नारायण चौधरी यांचं नाव जाहीर केलं होतं. पण त्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर नाराज झालेल्या चौधरींनी काँग्रेसनं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटचा पर्याय निवडला. यानंतर काँग्रेसनं चौधरी यांना महापौरपदाची उमेदवारी जाहीर केली. तसा व्हिपही जाहीर केला.

    चंद्रपुरात भाजपनं काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेतला. आता काँग्रेसनं भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत भिवंडीत सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. भाजपमधील ९ नगरसेवकांचा फुटीर गट काँग्रेस सोबत गेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस विचारांशी, विचारधारेशी तडजोड करणार नाही. आम्ही भाजप , शिंदेसेनेसोबत जाणार नाही. आम्ही त्यांचा पाठिंबा घेणार नाही आणि त्यांना पाठिंबा देणारही नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ‘भाजपमधील नगरसेवकांच्या एका गटानं काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सोडून, त्यांच्या विचारधारेचा त्याग करुन कोणी आमच्या सोबत येत असेल तर आम्ही चर्चा करु, अशी आमची भूमिका आहे. पक्ष सोडणार असतील तरच चर्चा करु अशी आमची अट होती. आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला,’ असं सपकाळ यांनी सांगितलं.

    नारायण चौधरी आधी काँग्रेसमध्येच होते. निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये गेले. आता त्यांनी वेगळा गट तयार केला आहे. काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटमध्ये येण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो, असं सपकाळ म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा