Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेतील उद्धवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. याबद्दलचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर हा निर्णय तातडीनं घेतला गेला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या तिघांच्या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. राज ठाकरे यांनी काल शिंदे यांची त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवकांचा विषय तातडीनं मार्गी लावला आहे. शिंदे- राज यांच्या भेटीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित केली आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवसेनेनं ६५, तर मनसेनं ६ जागा जिंकल्या. तर भाजपला ८९ आणि शिंदेसेनेला २९ जागांवर यश मिळालं. या संख्याबळाच्या जोरावर भाजपला ४, शिंदेसेनेला २, काँग्रेसला १ आणि उद्धवसेनेला ३ स्वीकृत नगरसेवकांची वर्णी लावता येतील. ठाकरेसेनेला मिळालेल्या तीनपैकी एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी मनसे आग्रही होती असं समजतं. पण उद्धव यांनी तिन्ही जागांसाठी नावं निश्चित केली आहेत.
ठाकरेंनी निवडलेले तीन शिलेदार कोण?
माधुरी मांजरेकर- महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या. ही नाराजी त्यांनी सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर उघड केली होती. पण मातोश्रीवरील मनधरणीनंतर त्या प्रचारात सक्रिय झाल्या होत्या.
साईनाथ दुर्गे- युवासेनेचे सक्रिय सदस्य असलेले साईनाथ दुर्गे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार आहेत. मातोश्रीचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. युवासेनेच्या कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय असतात. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उमेदवार ठरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
कैलास पाठक- उत्तर भारतीय मंचाचे पदाधिकारी आहेत. ते जोगेश्वरीचे उपविभाग प्रमुख आहेत.
