• Fri. Mar 6th, 2026
    आईचा जीव घेतला, 33 वर्षांचा लेक माऊलीच्या बॉडीशेजारी गोट्या खेळत बसला, महाराष्ट्र सुन्न

    Ahilyanagar Son kills Mother : संतापाच्या भरात सुहासने आईला बेडरुममध्ये डांबून ठेवत कैऱ्या कापण्याच्या अडकित्त्याने डोक्यात वार केले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : शहरातील सावेडी उपनगरात मंगळवारी दुपारी उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. पैशांच्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या आईचा अडकित्त्याने वार करत निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेहाशेजारी शांतपणे गोट्या खेळत बसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नवलेनगर परिसरातील गजानन मंदिरासमोरील भाड्याच्या खोलीत ही घटना घडली. बेबी सुधाकर गवारे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा सुहास सुधाकर गवारे (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे.

    पैसे न दिल्याचा राग; अडकित्त्याने वार

    मिळालेल्या माहितीनुसार, सुहास हा आईकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. मंगळवारी दुपारी पुन्हा पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात सुहासने आईला बेडरुममध्ये डांबून ठेवत कैऱ्या कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडकित्त्याने डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या बेबी गवारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने दरवाजाला आतून खाट व धान्याच्या कोठ्या लावून घेतल्या आणि आईचा मृतदेह शेजारी असतानाच पलंगावर बसून गोट्या खेळत राहिला. हातातील कात्री, अडकित्ता आणि गोट्या खिडकीतून पोलिसांना दाखवत तो स्वतःशीच बडबड करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

    दरवाजा तोडून पोलिसांची कारवाई

    परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडण्यास सांगूनही आरोपी बाहेर आला नाही. सुमारे अर्धा तास समजूत काढल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
    Maharashtra TimesSahil Dhaneshra : रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अल्पवयीन आरोपी दहावीच्या परीक्षेसाठी जामिनावर, हतबल आई रडत म्हणाली…

    मूळ कुटुंब कोपरगावचे ; बहिणीची फिर्याद; खुनाचा गुन्हा दाखल

    गवारे कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील आहे. पतीच्या निधनानंतर बेबी गवारे या मुलासह सावेडीतील भाड्याच्या खोलीत राहत होत्या. त्या घरकाम करून संसार चालवत होत्या. आरोपी सुहास कोणते काम करत होता, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. मयत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहास गवारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesPune Crime : किचनमध्ये काम करताना खुर्चीवरुन पडल्या, पुण्यात महिलेचा मृत्यू, मुलगी धावत आली अन्…

    माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली

    चौकशीदरम्यान आरोपीने माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली. मात्र त्याचे वर्तन संशयास्पद असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे की नशेच्या प्रभावाखाली होता, याचा तपास सुरू आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना उघड होताच गुलमोहोर रोड परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. आईच्या मायेचा असा थरारक अंत झाल्याने शहरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पैशांसाठी मुलाने आईचा जीव घेण्याचा हा प्रकार समाजमन सुन्न करणारा ठरला आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा