वकिलाची फी देण्यास टाळाटाळ करण्यासाठी नांदेडच्या एका महिलेने चक्क घरफोडीत १२ लाख रुपये चोरी झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी तपास केला असता दागिने चोरी झाले होते, पण पैसे महिलेनेच लपवले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
मंगल पोशट्टी जांगलीवाड ह्या नंदी शहरातील काॅनॉल रोड येथील संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. शेतीच्या वाटणीत मंगल जांगीलवाड या महिलेला 12 लाख 50 हजार रुपये हिश्याला आले होते. वकिला मार्फत न्यायालयात दावा केला होता. दरम्यान, महिलेकडे लाखो रुपये असल्याची माहिती घरा शेजारी राहणाऱ्या स्मिता लक्ष्मण पौळ आणि संध्या किशनराव डोणगे या मैत्रिणीला मिळाली. १५ फेब्रुवारी रोजी या दोन्ही मैत्रिणीने आपल्या इतर सहकार्यासोबत घरफोडी करत लाखो रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. सदर महिलेने भाग्यनगर पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली.
बनाव केल्याचे उघडकीस
पोलिसांच्या डीबी पथकाने आनंद नामदेवराव जाधव (काबरानगर), राजेश लक्ष्मण पांचाळ (सिडको), पुजा दिपक नरवाडे (काबरानगर), स्मिता लक्ष्मण पौळ (संभाजीनगर), संध्या किशनराव डोणगे (संभाजीनगर) या पाच जणांना तुळजापूर येथून ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान आरोपीनी केवळ सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची कबूली दिली. घरात पैसे चोरी केले नसल्याचे आरोपीनी सांगितले. त्यानंतर पोलिसांना संशय आला आणि फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा महिलेने रोख रक्कम चोरी झाल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले.
Crime News: पाय एका गोणीत, डोकं दुसऱ्या; बॉडी दोन गोण्यात टाकली अन् शिवून घाटात फेकल्या, अहिल्यानगरमध्ये खळबळ
एका प्रकरणामध्ये वकीलाला फीस द्यायची होती, वकिलाकडून पैश्याचा तगादा सुरु होता, पैसे मागू नये म्हणून फिर्यादी महिलेने हा बनाव केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी फिर्यादी महिले सह घरफोडी करणाऱ्या पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे.
महिलेने आईकडे ठेवले पैसे
वाटणीत महिलेला १२ लाखाहून अधिक रुपये हिश्याला आले होते. एवढी मोठी रक्कम घरात ठेवण्या ऐवजी मंगल जांगीलवाड यांनी पैसे आईकडे ठेवले होते. दरम्यान घरफोडीत पैसे चोरी झाल्याच सांगितल्यानंतर पोलिसांना सर्व काही संशयास्पद वाटत होते. त्यामुळे फिर्यादी महिला मंगल जांगीलवाड यांची कसून व क्रॉस पद्धतीने तपासणी केली तेव्हा फिर्यादीने सदरचे पैसे या पूर्वीच उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे राहणाऱ्या आईकडे दिल्याचे समोर आले.
पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या आईकडून साडेबारा लाख रुपये जप्त केले. ज्या पैशाची चोरी झालीच नाही परंतु चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या फिर्यादी महिला मंगल जांगीलवाड यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
