अहिल्यानगरच्या वांबोरी घाटात दोन गोण्यांत शिवून भरलेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्यंत क्रूरपणे हत्या करून मृतदेह दरीत फेकण्यात आला असून…
वर्दळीच्या घाटात भीतीचे सावट ; पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे मोठे आव्हान
वांबोरी घाट हा कायम वर्दळीचा मार्ग असल्याने ही बातमी क्षणार्धात पसरली. बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, मृताची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
Ahilyanagar News: ‘बायको मुलांपेक्षा तुम्ही जास्त आवडता…’; मजनू सरपंचाची ग्रामसेविकेला अजब मागणी, ग्रामसेवक संघटनेची आक्रमक भूमिका
हत्या की गँगवॉर? तपास वेगात
ही हत्या वैर, आर्थिक वाद, टोळी संघर्ष की इतर कारणातून झाली याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपींचा लवकरात लवकर शोध लावण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
