• Fri. Mar 6th, 2026
    Bhandara Crime: ‘माझे बाळ परत द्या हो’; हॉस्पिटलमधून डॉक्टरनेच बाळ दुसऱ्या महिलेला विकलं, खळबळजनक प्रकार उघड

    Bhandara News: सिझेरियननंतर साडेतीन महिने बाळावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर आईला अंधारात ठेवून आणि कुटुंबाच्या गरिबी आणि हतबलतेचा फायदा घेत नराधम डॉक्टरने चिमुकलीच्या विक्रीचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    ‘माझे बाळ परत द्या हो’; हॉस्पिटलमधून डॉक्टरनेच बाळ दुसऱ्या महिलेला विकलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या बाळविक्री प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता बाळाच्या जन्मदात्या आईने ‘माझे बाळ परत द्या हो’ अशी काकुळतीची विनंती केली आहे. त्यामुळे बाळविक्रीचा हा घाट जन्मदात्यांना अंधारात ठेवून तसेच त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत घालण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यातही या डॉक्टरांकडून जिल्ह्यात एका बाळाची विक्री झाल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती आहे. यामुळे स्थानिक न्यू बालाजी हॉस्पिटलचा संचालक डॉ. नितेश बाजपेयी याने केलेला प्रताप चांगलाच चर्चेत आला आहे.

    रुग्णालयात उपचार आणि प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरीब कुटुंबांची फसवणूक करीत बाळाला विकण्याच्या प्रकरणात आता नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत. तिरोडा तालुक्यातील सेजगाव (टोला) येथील गर्भवतीस सातव्या महिन्यातच प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यामुळे महिलेने तातडीने गोंदिया येथील गंगाबाई स्त्री रुग्णालय गाठले. सोनोग्राफीनंतर दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा असह्य वेदना झाल्याने ती न्यू बालाजी रुग्णालयात आली. गुंतागुंत निर्माण झाल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने दाखल करून घेत ‘सिझेरियन करावे लागेल’ असे सांगितले. १६ ऑक्टोबर रोजी या महिलेने एका चिमुकलीला जन्म दिला.

    बाळ ‘प्री-मॅच्युअर’ (मुदतीपूर्वी जन्मलेले) असल्याने उपचारासाठी नवजात बाळाला बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. या रुग्णालयात जवळपास १ महिना ५ दिवस तिच्यावर उपचार सुरू राहिले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुन्हा २२ नोव्हेंबर २०२५पासून तिला रामनगर येथील न्यू बालाजी रुग्णालयात डॉ. नितेश बाजपेयी याच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले. जवळपास साडेतीन महिने बाळावर या रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान मातेला अंधारात ठेवून त्यांच्या गरिबी आणि हतबलतेचा फायदा घेत डॉक्टरने तिच्या चिमुकलीच्या विक्रीचा कट रचला.

    दरम्यान, डॉक्टर बाजपेयी आणि साथीदारांनी मिळून पांढराबोडी येथील मालती वाघमारे या महिलेला बाळविक्री केल्याचं समोर आलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा