• Mon. Mar 9th, 2026

    ‘हिंद-दी-चादर’समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील 2 हजार 998 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2026
    ‘हिंद-दी-चादर’समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील 2 हजार 998 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग – महासंवाद

    नवी मुंबई, दि. 15 (विमाका) : ‘हिंद-दी-चादर’ गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती आणि स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. 10 फेब्रुवारी ते 01 मार्च 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील एकूण 2 हजार 998 ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
    कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ समागमाच्या प्रचार व प्रसिध्दीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
    10 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्व 2 हजार 998 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी 174 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा पार पडल्या आहेत. या ग्रामसभांमधून ‘हिंद-दी-चादर’ समागमाबाबत माहिती देण्यात येत असून, नागरिकांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक जनजागृती केली जात आहे.
    समागमाची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या ग्रामपंचायतींमध्ये लाऊडस्पीकरद्वारे प्रसिद्धी करण्यात आली आहे. तसेच गावांच्या प्रवेशद्वारांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 2 हजाराहून अधिक जनजागृती बॅनर्स लावण्यात आले आहेत. या उपक्रमांचा व्यापक प्रसार करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील विविध कार्यक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत.
    ‘हिंद-दी-चादर’ समागमाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार कोंकण विभागातील ग्रामपंचायतींमध्ये दररोज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, गाव परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
    ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती, ग्रामसभा, स्वच्छता मोहीम आणि प्रसिद्धी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या समन्वयातून हे उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहेत.
    ‘हिंद-दी-चादर’ समागमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणारे हे उपक्रम नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासोबतच स्वच्छता आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत असून, कोंकण विभागात व्यापक जनसहभाग दिसून येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *