बीडच्या सहयोग नगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वादातून पिता-पुत्रावर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला. पाच दिवसांपूर्वीही घरात घुसून मारहाण झाली होती.
पाच दिवसांपूर्वीही घरात घुसून हल्ला
या घटनेपूर्वी अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच टोळक्याने कोकाट कुटुंबाच्या घरात घुसून महिलांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या टोळक्यात काही महिलांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्या वेळी छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र “आम्ही मारहाणीची तक्रार का दिली?” या कारणावरून सूडबुद्धीने आजचा हल्ला झाल्याचा आरोप कोकाट कुटुंबीयांनी केला आहे.
कॅमेऱ्यामुळेच वाद कुटुंबाचा आरोप
कोकाट कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, समोरच्या घरात बेकायदेशीर व्यवसाय सुरू असून त्यांच्या घरावर सुरक्षेसाठी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोरील लोकांना अडथळा निर्माण होत आहे. “गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला सातत्याने त्रास दिला जात आहे. अनेक वेळा पोलिसांत तक्रारी दिल्या, पण ठोस कारवाई झाली नाही,” असा गंभीर आरोप सदाशिव कोकाट यांनी केला आहे.
Tipu Sultan Controversy: ‘संविधानात मूळ प्रतीत टिपू सुलतानचा फोटो असेल तर…’; भाजप नेत्याने दिला इशारा
पोलिसांवरही गंभीर आरोप
तक्रार दिल्यानंतरही आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. उलट आम्हालाच गप्प बसण्यास सांगितले जाते, असा थेट आरोप कोकाट कुटुंबाने पोलिस प्रशासनावर केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
नागरिकांत संताप
घटनेनंतर सहयोग नगर परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी तात्काळ कडक कारवाईची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित टोळक्यावर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे सहयोग नगरमधील नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
