सोलापुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक, टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याने भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनसमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीत टिपू सुलतान यांचा फोटो असेल तर आम्ही केंद्रात निवेदन देऊन पुढील कारवाईची मागणी करू, अशीही प्रतिक्रिया रोहिणी तडवळकर यांनी दिली.
भाजपचा तीव्र निषेध आणि माफीची मागणी
भाजपचे माजी शहराध्यक्ष व विद्यमान गटनेते नरेंद्र काळे यांनी इतिहासकारांना खुले आव्हान दिले आहे. इतिहासकार म्हणतात, टिपू सुलतान स्वातंत्र्यसेनानी होता. तर त्याच इतिहासकारांनी टिपू सुलतान यांची दुसरी बाजू समोर आणावी. टिपू सुलतान याने हजारो महिलांच्या अब्रू लुटल्या होत्या, हजारो हिंदूंची कत्तल केली. टिपू सुलतानची ही बाजू समोर यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे. ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने महाराष्ट्र राज्यातील जनता आक्रमक झाली आहे.
Tipu Sultan Controversy: ‘सपकाळांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस देणार’; हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक, बड्या नेत्याचं वक्तव्य
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र शब्दांत निषेध करत सपकाळ यांची प्रतिमा फाडून, जोडे मारले आणि पायदळी तुडवले. विशेष म्हणजे हे आंदोलन काँग्रेस भवनसमोर करण्यात आले.
मोठ्या पोलीस बंदोबस्तात भाजपचे आंदोलन
भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूरमधील काँग्रेस भवनसमोर अचानक आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांसमोर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिमा फाडण्यात आली, जोडे मारण्यात आले तसेच एक मडके आणून काँग्रेस भवनसमोर फोडण्यात आले.
