Kolhapur Crime News : कोल्हापुरात काल शनिवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
काल शनिवार सकाळी स्थानिक नागरिक फेरफटका मारत असताना हा प्रकार त्यांच्या नजरेस पडला. काळ्या दोऱ्याने बांधलेल्या काळ्या बाहुलीला तरुणीचा फोटो जोडला असून, दोघांनाही खिळे ठोकलेले होते. फोटो आणि बाहुलीवर हळद-कुंकू लावलेले असल्याने हा अघोरी किंवा जादूटोणासारखा प्रकार असल्याची चर्चा परिसरात पसरली. कोडोलीसह पंचक्रोशीत नागरिकांमध्ये भीती पसरली असून, विशेषतः महिलांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
Jalna Crime: भावाला कॉल आला, हॉस्पिटलला जाऊन पाहताच विवाहित बहिणीची बॉडी दिसली अन्…; धक्कादायक कारण उघड
भानामती की वैयक्तिक सूड?
व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, मात्र याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे वैयक्तिक वाद किंवा सूडबुद्धीचा संशय व्यक्त होत आहे. काही स्थानिकांचा असा विश्वास आहे की, ही भानामती असावी, ज्यामुळे संबंधित तरुणीवर जादूटोणा होईल. दुसरीकडे, काहींच्या मते कोणीतरी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न असू शकतो. संबंधित तरुणीची ओळख पटलेली नसली तरी तिचा फोटो काढून घेण्यात आला असल्याची माहिती आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अद्याप चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिल्याचे समजते. नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावे, पंचनामा करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तपास वेगाने घेऊन परिसरातील भीती दूर करावी. अशा अंधश्रद्धात्मक किंवा खोडसाळ प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने वागावे, अशी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कोडोली परिसरात दिवसभर तर्कवितर्क चालू राहिले. पोलिस तपासातून खरी बाब समोर येण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच या प्रकरणाबाबत नागरिकांची अस्वस्थता दूर होईल.
