• Sat. Mar 7th, 2026
    Mulund Metro Accident : मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनाची मोठी कारवाई, कंत्राटदाराला 5 कोटींचा दंड

    मुलुंडमधील मेट्रो पिलरचा भाग कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता मोठी कारवाई समोर आली आहे.

    मुलुंड मेट्रो दुर्घटनेत कंत्राटदारावर मोठी कारवाई, ५ कोटी रुपयांचा दंड.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: आजचा दिवस मुंबईकरांना एका मोठ्या दुर्घटनेने आठवणार आहे. त्याचं कारण म्हणजे आज मुंबईतल्या मुलुंडमध्ये एक भीषण दुर्घटना झाली. मुलुंडमध्ये मेट्रोचं काम प्रगतीपथावर आहे. पण आज एलबीएस मार्गावर मेट्रोचा पिलरचा भाग कोसळून भयानक घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांमधून खूप संताप व्यक्त केला गेला. तर आता यासंबंधी मोठी अपडेट समोर येते आहे. ती म्हणजे या प्रकरणात आता कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय जनरल कन्सल्टंटला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. ही मोठी कारवाई झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुगदल यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी आज दुर्घटनास्थळी भेट दिली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलले.

    दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार

    मुगदलांनी सांगितले की, “याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल, ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होईल. सर्व तक्रारींवर कारवाई सुरु करण्यात आली आहे”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. “एमएमआरडीएकडून या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधितांवर पुढे कारवाई केली जाईल”, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

    Maharashtra TimesSanjay Kenekar : भाजप आमदार संजय केनेकर यांच्या ऑफिसमध्ये एअर गन ठेवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

    मुख्यमंत्र्यांचेही चौकशीचे आदेश

    दरम्यान, दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरील उपचारांचा खर्च हा सरकारच्या माध्यमातून केला जाईल,असं स्पष्ट केलं आहे. याबद्दल त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला आहे आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही याबद्दलची माहिती दिली आहे.

    असं असलं तरी याप्रकारच्या घटना घडतात तरी कशा, आणि काम सुरु असताना नागरिकांच्या सुरक्षेचा विचार का केला जात नाही अशा प्रकारचा सूर नागरिकांमधून येतो आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा