तुमच्या मंत्र्यालयातील हा क्लार्क होता, तर ही जबाबदारी तुमच्यावरही येत नाही का? असा प्रश्न आज नवी दिल्ली इथं पत्रकारांकडून मंत्री नरहरी झिरवळ यांना विचारण्यात आला. त्यावर झिरवळ म्हणाले की, “ही जबाबदारी आहेच, नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो. या प्रकरणाची चौकशी व्हावी. चौकशीत जर या लाच प्रकरणाची लिंक माझ्यापर्यंत जोडली गेली, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.
“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार”
“जो गैरप्रकार झालाय, त्याला आपण कसल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही. जी शासकीय किंवा कायदेशीर बाब असेल त्याचा त्याला जाब द्यावा लागेल. कारकून म्हणून त्याचं कार्यालय बाहेर होतं. मंत्री किंवा मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी यांच्याशी त्याच्या तसा थेट संबंध नाही. माझं कार्यालय सील केल्याची माहिती मला तुमच्याकडूनच मिळत आहे. पण मला असं वाटत नाही की मंत्रालयातील माझं कार्यालय सील केलं गेलं असावं. मी आज दिल्लीवरून मुंबईला जाणार आहे. मुंबईतगेल्यानंतर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन आणि या सर्व प्रकरणाविषयी त्यांच्यासोबत चर्चा करेन,” असं म्हणत Narhari Zirwal यांनी लाच प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे.
मंत्रालयात नेमकं काय घडलं?
एका तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला होता. त्याचा औषधांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. ही निलंबन कारवाई रद्द करण्यासाठी राजेंद्र ढेरंगे या मंत्रालयातील क्लार्कने 50 हजार रुपये लाच मागितली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच एसीबीने पडताळणीनंतर सापळा रचला, त्यात ढेरंगे सापडले. त्यांचे कार्यालय आणि निवासस्थानी एसीबीकडून शोधाशोध सुरू आहे. ढेरंगे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.