• Mon. Sep 7th, 2026

अजितदादांची जागा भरून काढणार, १५ वर्षांची परंपरा कायम ठेवणार; सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांसाठी खास निर्णय

ByMH LIVE NEWS

Feb 13, 2026
अजितदादांची जागा भरून काढणार, १५ वर्षांची परंपरा कायम ठेवणार; सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांसाठी खास निर्णय
पुणे 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षानुवर्षे दर शुक्रवारी पुण्यातील सर्किट हाउस येथे सकाळी सहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी उपस्थित असत. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना भेटण्यास पुण्यात उपस्थित राहणार असून, त्यासाठी ‘दादां’नी घालून दिलेला शिरस्ताही त्या पाळणार असल्याचे दिसते आहे. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शुक्रवारी ‘व्हीआयपी सर्किट हाउस’ येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी उपस्थित राहणार आहेत.अजितदादा हे जवळपास १५ वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. या काळात दर शुक्रवारी ते पुण्यात कार्यकर्त्यांना भेटत. त्यानंतर शनिवारी ते बारामतीला मतदारसंघात जात असत. सुनेत्रा पवार पुण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेले बहुतांश सदस्य त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत.

अजितदादांची उणीव सर्वांनाच भासली, पुण्यातील बैठकीत काय घडलं?

पुणे, मुंबई, बीड किंवा बारामतीला कोणत्याही विभागाची बैठक असो. त्या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार येणार म्हटल्यावर कर्मचारी, अधिकाऱ्यांपासून सचिवांपर्यंत विविध प्रकारची माहिती घेऊन सज्ज, तर विविध मागण्यांचे निवेदने घेऊन आमदार, खासदार लोकप्रतिनिधी बैठकीला जातीने हजर राहत. त्याशिवाय कार्यकर्त्यांची गर्दी ही वेगळीच. मात्र, अनेक मॅरेथॉन बैठका घेणाऱ्या अजितदादांच्या अनुपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली. एखाद्या अधिकाऱ्याकडून चुकीचे काम झाल्याची तक्रार येताच त्यांना तंबी देणारे, चांगल्या कामाचे कौतुक करणारे आणि मिश्कीलपणे हसत-खेळत चर्चा पुढे नेणाऱ्या अजितदादांची उणीव लोकप्रतिनिधींपासून ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलीच जाणवली.

दरम्यान, ‘कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमकरिता जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील झुंबर सभागृहात विविध बैठकाही आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील क्रिकेट स्टेडियम आणि झुंबर सभागृहाला अजित पवार यांचे नाव द्यावे,’ अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.

‘भविष्याचा वेध घेणारे दादा’

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कार्यपद्धतील सुक्ष्म अभ्यासातून भविष्याचा वेध घेण्याचा आग्रह करणारे व्यक्तिमत्त्व होते. राज्याच्या प्रगतीत त्यांचे फार मोठे योगदान होते. पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक खऱ्याअर्थाने वेळेत सुरू करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.’

‘न भरणारी पोकळी’

भरणे म्हणाले, ‘अजित पवार यांच्या निधनाने राज्यासह पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले असून, त्यांची पोकळी न भरून निघणारी आहे. राज्यासह पुणे जिल्ह्याची प्रगती करून सर्व क्षेत्रांत पुढे जावे हा त्याचा मानस होता. त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका होती.’

‘सर्वांना न्याय देण्याची भूमिका’

‘अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री; तसेच विरोधी पक्षनेता अशा विविध भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयाने कामे करीत असताना विविध विकासकामे मार्गी लागली. पायाभूत प्रकल्पांचे सादरीकरण समजून घ्यायचे. त्यामध्ये आवश्यतेनुसार बदल सुचवायचे. गोरगरीब सामान्य नागरिकांचे प्रश्न तळमळीने सोडवून त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती,’ अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावना व्यक्त केल्या. त्या वेळी दादांचे लोकोपयोगी स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed