Solapur-Mumbai Vande Bharat Express : सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला तीन वर्षांत प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘वंदे भारत’मुळे प्रवास वेगवान झाल्याचा फायदा प्रवाशांना झाला. तीन वर्षांत 23 लाख प्रवाशांनी लाभ घेतला आहे.
पुणे, सोलापूर विभागांतून ‘वंदे भारत’ सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर नऊ फेब्रुवारी 2023 रोजी सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली होती. तीन वर्षांचा टप्पा पार करून, ही ‘वंदे भारत’ने प्रवाशांच्या पसंतीची जलद आणि आधुनिक सेवा म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. या गाडीने अल्पावधीतच प्रवासीसंख्या, वेळेची बचत आणि सुविधा या तिन्ही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. जानेवारी 2026 पर्यंत गाडीची सरासरी 102.27 टक्के ऑक्युपन्सी (प्रवासी वारंवारिता) नोंदली गेली असून, जवळपास 23.43 लाख प्रवाशांनी आरामदायी प्रवास केल्याचे दिसून आले आहे. आधुनिक पुश-अँड-पुल तंत्रज्ञानामुळे भोरघाटासारख्या अवघड घाट विभागातूनही बँकर लोकोशिवाय रेल्वेची सुरळीत धाव शक्य झाली आहे.
Konkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल
पुणे-मुंबई-पुणे 13.5 लाख प्रवासी
सोलापूर-पुणे-मुंबई असा प्रवास करणाऱ्या ‘वंदे भारत’ला पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. पुणेकरांसाठी तर सकाळच्या वेळी एक आणखी एक्स्प्रेस रेल्वे सेवा मिळाल्याचा खूप मोठा फायदा झाला. या गाडीला पुण्यातून मोठी गर्दी असते. मुंबईला नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या आणि परत पुण्याला येणाऱ्यांसाठी ही रेल्वे लाभदायी ठरली आहे. त्यामुळे तीन वर्षांत या मार्गावर पुणे-मुंबई-पुणे असा साडेतेरा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
अशी धावते ‘वंदे भारत’
पुणे-सोलापूर-पुणे असे 455 किलोमीटर अंतर अवघ्या सहा तास 30 मिनिटांत पूर्ण करणारी ही गाडी पारंपरिक सुपरफास्ट सेवांच्या तुलनेत सुमारे दीड तासाचा वेळ वाचवते. कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर हे थांबे असलेली ही सेवा सध्या आठवड्यातून सहा दिवस धावते. वाढत्या मागणीमुळे ऑगस्ट 2025 मध्ये या ‘वंदे भारत’ला 16 ऐवजी 20 डब्यांचा रेक जोडण्यात आला असून, आसनक्षमता 1,440 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Mahim-Bandra Flyover: पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडी फुटणार, खाडीवरील पुलामुळे दादर, खार, सांताक्रूझ प्रवाशांना दिलासा; पण तीन वर्षे पूल कागदावरच
तीन वर्षांत ‘वंदे भारत’ची धाव
पुणे ते मुंबई प्रवासी संख्या : सहा लाख 74 हजार
मुंबई ते पुणे प्रवासी संख्या : सहा लाख 73 हजार
सोलापूर ते पुणे प्रवासी संख्या : दोन लाख 20 हजार
पुणे ते सोलापूर प्रवासी संख्या : एक लाख 70 हजार
