• Mon. Jun 15th, 2026

    आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज – आमदार संजय केळकर

    ByMH LIVE NEWS

    Feb 12, 2026
    आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ही काळाची गरज – आमदार संजय केळकर

    ठाणे

     आपत्ती व्यवस्थापन प्रश‍िक्षण ही काळाची गरज असून याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना महाविद्यालयात असतानाच मिळाले तर निश्चितच अनेक  विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतील, यासाठी बांदोडकर महाविद्यालयाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले ही निश्च‍ितच कौतुकाची बाब असल्याचे आमदार संजय केळकर यांनी येथे नमूद केले.

    नागरी संरक्षण संघटना तसेच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यामार्फत ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे बा. ना. बांदोडकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवायोजन यांच्या विद्यार्थ्यांसाठी “आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण मध्ये विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग” ह्या विषयावर तीन दिवसीय  जनजागृती व आपत्ती व्यवस्थापनाचे तीन दिवसीय प्रात्यक्षिक शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विजय जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे, यासीन तडवी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ठाणे महापालिका आणि मीनल वानखेडे उप प्राचार्या बा. ना बांदोडकर महाविद्यालय यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

                तीन दिवसांत आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि आग ह्या विषयांवर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपत्कालीन उचल पद्धती, कृत्रिम श्वसन पद्धती आणि आग विझवण्यासाठी वापराच्या पद्धती यांची प्रात्यक्षिके करून दाखवले ह्या कार्यात त्यांना रोहित सिंग राठोड यांनी सहकार्य केले.

                एकीकडे दिवसेंदिवस वाढते शहरीकरण आणि भरमसाट होणारी लोकसंख्या वाढ आणि त्यामानाने प्रशासकीय व आपत्ती निवारणासाठी असलेले तुटपुंजे मनुष्यबळ पाहता जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणे व आपत्ती सजगता वाढवणे अतिशय गरजेचे असल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख  यासीन तडवी यांनी देखील मार्गदर्शन करताना नमूद केले.  नागरी संरक्षण व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्फत बांदोडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवायोजन  चे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयी जनजागृती तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यात वापरण्याचे साहित्य यांची माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

    या तीन दिवसीय शिबिरात नागरी संरक्षण संघटनेचे सहाय्यक उपनियंत्रक आननसिंग गढरी , बिमल नथवाणी उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र – 1 , कमलेश श्रीवास्तव उपमुख्य क्षेत्ररक्षक क्षेत्र- 3, कॅरमबिर सिंग भुर्जि उपमुख्यक्षेत्ररक्षक क्षेत्र – 4 , हनुमान चौधरी विभागीय क्षेत्ररक्षक मानपाडा डोंबिवली, रोहित सिंग राठोड स्वयंसेवक नागरी संरक्षण दल यांनी सहभाग घेतला. या शिबिरात बिमल नथवाणी व हनुमान चौधरी आदींनी मार्गदर्शन केले.

    महाविद्यालयाच्या उप प्राचार्या  मीनल वानखेडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ह्या शिबिरात सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच ह्या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या नागरी संरक्षण आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे आभार मानून यापुढे देखील विद्यार्थ्यांसाठी असेच शिबिराचे आयोजन करण्याचे तसेच प्रगत प्रशिक्षण वर्ग देखील नागरी संरक्षण संघटनेचे मार्फत आयोजन करण्यास महाविद्यालय सहकार्य करेल असे सांगितले.  या तीन दिवसीय शिबिरात महाविद्यालयाचे 120 विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गातून उमालक्ष्मी पाटणे, सायली दप्तरदार , ऋषिकेश लबदे हे देखील सहभागी झाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed