• Fri. Mar 6th, 2026
    महात्मा गांधींवरील निबंधाची दखल, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोषी तरुणाची शिक्षा घटवली, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

    Mahatma Gandhi Essay reduces Convict Punishment : २०१६ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे, परंतु त्याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यास पात्र असल्याचे नमूद केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कामुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेप सुनावलेल्या आरोपीची शिक्षा कमी करण्यात आली आहे. आरोपीचे तरुण वय, दीर्घकालीन तुरुंगवास आणि जेलमधील सुधारणात्मक प्रयत्नांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा बारा वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे महात्मा गांधींवरील निबंध उपक्रमातील सहभागाचाही यात समावेश आहे.

    न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने २ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. त्यानुसार २०१६ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे, परंतु त्याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यास पात्र असल्याचे नमूद केले.

    काय आहे प्रकरण?

    विशेष पोक्सो न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला दोषी तरुणाने आव्हान दिले होते. या याचिकेवर खंडपीठाने हा आदेश दिला. गुन्ह्याच्या वेळी दोषी केवळ २० वर्षांचा होता. त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो डिसेंबर २०१६ पासून कोठडीत होता. कोविड-१९ काळातही त्याची सुटका झाली नव्हती, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

    तुरुंगातील शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या दोषी तरुणाचा प्रशस्तिपत्रकांचाही कोर्टाने विचार केला. यामध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा अभ्यास करणारा उपक्रम आणि निबंध स्पर्धेचाही समावेश आहे.

    काय आहेत कारणं?

    गुन्ह्याच्या गांभीर्याच्या पार्श्वभूमीवर या सुधारणात्मक घटकांचा विचार करत खंडपीठाने म्हटले की, “आमच्या मते १२ वर्षांची शिक्षा न्यायाच्या उद्दिष्टांना पूर्ण करेल. दोषी तरुणाने आधीच तुरुंगात घालवलेला कालावधी पाहता शिक्षा कमी झाल्याने तो वसूल होईल, असेही कोर्टाने म्हटले आहे.

    काय घडलं होतं?

    ९ डिसेंबर २०१६ रोजी त्यावेळी पाच वर्षांची असलेली चिमुरडी शेजाऱ्यांच्या घरी पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने तात्काळ आपल्या कुटुंबाला हा प्रकार सांगितला. त्यांनी तरुणाला जाब विचारला आणि पोलिसात तक्रार दाखल केली. कोर्टात खटला सुरु असताना आठ वर्षांच्या झालेल्या पीडितेने आरोपीला ओळखलं होतं.

    अल्पवयीन मुलीची साक्ष विश्वसनीय आणि सुसंगत असल्याचे हायकोर्टाने लक्षात घेतले होते. तिने घटना स्पष्टपणे सांगितली होती, तिला पढवल्याचे वाटत नव्हते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा