नेमकं प्रकरण काय? ‘त्या’ शब्दावरून वाद
संभाजीनगमरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचे आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यावर एका विशिष्ट शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे. यावर बोलताना ते म्हणाले, “माझी चूक एवढीच की मी सरकारी कागदपत्रात असलेला शब्द वाचला. केंद्र सरकारने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत की सरकारी कागदपत्रातून असे शब्द काढले जावेत.
जर सरकारने ते शब्द अजूनही काढले नसतील आणि मी ते वाचले, तर गुन्हा माझ्यावर कसा होऊ शकतो? खऱ्या अर्थाने केस तर राज्य सरकार किंवा पालकमंत्र्यांवर व्हायला हवी.
पालकमंत्र्यांचे दबावतंत्र आणि पोलिसांचा वापर
पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधताना जलील म्हणाले की, “मागच्या काही महिन्यांपासून मी पालकमंत्र्यांच्या घोटाळ्यांविरुद्ध पुराव्यासहित पत्रकार परिषदा घेत होतो. मला रोखण्यासाठी त्यांनी त्यांच्या लोकांच्या माध्यमातून आणि पोलिसांवर दबाव टाकून हे गुन्हे दाखल केले. हे पूर्णपणे दबावतंत्र आहे. मी कोर्टात ‘डिस्चार्ज अप्लिकेशन’ दाखल केला आहे.”