BEST Bus Strike: शुक्रवारी ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिलाच दिवस होता. अनेक प्रवाशांना संपाबद्दल माहिती नसल्यामुळे रांगे उभं राहिल्यावर सेवा बंद असल्याचं कळलं. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर शनिवारीही संप कायम राहील का?
सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली १९पैकी १२ कामगार संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने शुक्रवारी ‘बेस्ट’सेवा ठप्प झाली. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांना बससेवा बंद असल्याची माहिती बस थांबा-आगारात पोहोचल्यावर मिळाली. अनेक आगारांमध्ये प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या. प्रवाशांच्या मागणीनुसार काही गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, प्रवास पूर्ण होण्याआधीच संपकऱ्यांनी दगडफेक आणि धाकदपटशाहीने गाड्या रोखल्या. दहा बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे सकाळच्या सत्रानंतर ‘बेस्ट’ बस बाहेर पडल्या नाहीत. संपामुळे ॲपआधारित सेवेचे दरही वधारले. कुर्ला आणि वांद्रे पूर्वेतून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एका फेरीसाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागले. ‘कुर्ला आगारात रांगेत उभे असताना संपाची माहिती मिळाली. आधीच रांगेत प्रतीक्षा करावी लागल्यानंतर अॅप टॅक्सी आरक्षित करण्यासाठी वेळ गेला. अॅपवर भाडे अधिक दाखवत असल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागला’, अशी प्रतिक्रिया प्रवासी नरेश जाधव यांनी दिली.
Best Bus Strike: मुंबईकरांचे हाल, बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; काय आहेत प्रमुख मागण्या?
मेट्रोचा आधार
‘बेस्ट’ संपामुळे प्रवासी मेट्रोकडे वळले. ‘मुंबई मेट्रोवन’ने १० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला. रोजच्या तुलनेत शुक्रवारी सायंकाळी ५.३० पर्यंत मेट्रो वनमधून ३८ हजार अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो-३ची प्रवासीसंख्या गुरुवारच्या १,५१,५०२ वरून शुक्रवारी १,८१,७१६वर पोहोचली. मेट्रो २ब आणि ७ वरील प्रवासीसंख्येतही सुमारे १४ हजारांनी वाढ नोंदवण्यात आली.
सकारात्मक बैठकीनंतरही ‘बेस्ट’ संप कायम
बेस्ट कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली. कामगारांच्या मागण्या रास्त असून विलीनीकरणाबाबतचा निर्णय नगर विकास खात्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी केवळ सकारात्मक बैठक घेतली, मात्र कामगारांना निर्णायक बैठकीची अपेक्षा आहे. यामुळे ठोस निर्णय होईपर्यंत माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका संयुक्त कृती समितीने घेतली. परिणामी आज, शनिवारीही मुंबईकरांना ‘बेस्ट’ संपामुळे हाल सहन करावे लागणार आहेत.
Nashik Sangamner Pune Railway Project : नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे प्रकल्पाला रेड सिग्नल, प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात; कारण काय?
परिवहनमंत्री सरनाईक यांनी बेस्ट कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई सेंट्रल येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात बोलावली होती. बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव असिमकुमार गुप्ता, बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी हे अधिकारी उपस्थित होते.
