• Wed. Jun 10th, 2026
    Vande Bharat Express: मुंबई-कोकण रेल्वेमार्गावर वंदे भारत ट्रेनचा अपघात; म्हशींच्या कळपाला धडक, वाहतूक 3 तास ठप्प

    Vande Bharat Train Accident: सकाळी साडेअकरा वाजल्यापासून तब्बल तीन तास कोकण रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा झाला.

    vande bharat accident(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांदरम्यान रुळांवर आलेल्या चार म्हशींना मडगाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची धडक बसल्याने सोमवारी दुपारी कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. एक अपघातग्रस्त म्हैस ‘ओएचई’च्या खांबावर आदळल्याने ओव्हरहेड वायर रुळांवर कोसळून हा खोळंबा झाला. भराडीदेवीच्या यात्रेनिमित्त कोकणात आलेल्या भाविकांसह प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला.

    सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कोकणासाठी रवाना झाली. सकाळी ११.३०च्या सुमारास सिंधुदुर्ग ते कुडाळदरम्यान ओरोस स्थानकाजवळ म्हशींचा कळप रुळांवर आला. लोकोपायलटने हॉर्न दिला. मात्र कळप रुळांवरच राहिल्याने त्यांना एक्स्प्रेसची जोरदार धडक बसली. कळपातील एक म्हैस रुळांलगत असलेल्या ओव्हरहेड वायरच्या खांबावर आदळली. त्यामुळे ओव्हरहेड वायर रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या अपघातात चारही म्हशींचा मृत्यू झाला.

    Maharashtra TimesChembur Metro Station: पूर्व मुंबईकरांना मिळणार नवं मेट्रो स्थानक, एप्रिलमध्ये होणार सुरू; अंधेरी-मानखुर्द जोडणारी मार्गिका कशी असेल?
    याबाबत माहिती मिळताच कोकण रेल्वेवरील अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे ओव्हरहेड वायरही बाधित झाली होती. त्यामुळे ‘ओएचई’मधील विद्युतपुरवठा बंद करून तातडीने आपत्कालीन ब्लॉक घेत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रुळांवरून म्हशींना बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाकलेला खांब पूर्वस्थितीत आणण्यात आला. ओव्हरहेड वायर मूळ ठिकाणी बसवल्यानंतर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी सांगितले. रेल्वे मार्गासह खांब आणि ओएचईची तपासणी केल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे वाहतुकीसाठी मार्ग सुरक्षित घोषित करण्यात आला.

    Maharashtra TimesMohan Bhagwat: भाजपमुळे संघाला नाही, तर संघामुळे भाजपला अच्छे दिन; मोहन भागवतांच्या वक्तव्याची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
    कोकण रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस विलंबाबाबत कोणतीही माहिती समाजमाध्यमांवर दिली नाही. दुर्घटनेबाबत प्रवाशांना कोकण रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’लवरून माहिती मिळाल्यास प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करता येते. कोकण रेल्वेने वेळेवर माहिती न दिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली’, असे कोकण विकास समितीचे अक्षय महापदी यांनी सांगितले.

    अनेक गाड्या विलंबाने
    दुर्घटनेमुळे मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस सुमारे साडेतीन तास खोळंबली होती. दुर्घटनेमुळे वंदे भारत, राजधानी एक्स्प्रेस, मांडवी, मरूसागर, सीएसएमटी-जनशताब्दी, एलटीटी दुरांतो, मंगळुरू या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना मोठा विलंब झाला

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा