या व्हिडिओमध्ये शहरातून सजवून ठेवलेली एक पोलीस व्हॅन वऱ्हाडीसह जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हॅनवर “शिंदे–फडतरे यांचा शुभविवाह” असा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार पाहून अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, सोशल मीडियावर पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे.
शासकीय वाहनांचा वापर केवळ शासकीय कामांसाठीच करण्यात यावा, असा नियम असताना लग्नासारख्या खासगी कार्यक्रमासाठी पोलीस व्हॅनचा वापर कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘इसे बोलते है ट्रिगर…’; डायलॉग मारला अन् गोळी सुटली; म्हणाला ‘कुणीतरी गोळी झाडली’, पण पोलीसी खाक्यासमोर पोपटासारखा बोलला…
दरम्यान, या प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे आणि ठरावीक शुल्क भरून लग्नकार्यासाठी पोलीस व्हॅन उपलब्ध करून दिली जाते, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, संबंधित परवानगी घेतल्यानंतर व्हॅन सजवण्याची आणि त्यावर फ्लेक्स लावण्याचीही मुभा असल्याचं त्यांनी सांगितलं.
म्हणजेच, पिंपरी-चिंचवडमध्ये व्हायरल होत असलेली ही पोलीस व्हॅन रीतसर परवानगीने आणि नियमांच्या चौकटीतच वापरण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तरीदेखील, हा अनोखा प्रकार पाहून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मुळात शिंदे नावाचे कर्मचारी पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत.
पोलिसांना अनेकदा नागरिकांच्या रोषाला आणि आरोप-प्रत्यारोपांना सामोरं जावं लागतं. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी नियमाप्रमाणे आणि रीतसर शुल्क भरून पोलीस व्हॅन लग्नाच्या वऱ्हाडीसाठी वापरली असतानाही त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र नियम नेमकं काय सांगतो, हे स्पष्ट झाल्यानंतर तरी किमान नागरिकांनी या प्रकरणात पोलिसांची बाजू समजून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
