मुंबई
शारीरिक शोषणाच्या तसेच मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून पवईच्या आयआयटीतील माजी अधिकारी असलेल्या वयोवृद्ध महिलेची चार कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली.
आयआयटीतील या माजी महिला अधिकाऱ्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगत तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये सहा कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून हा मनी लॉड्रिंगचा प्रकार आहे. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे, असे सांगितले.
महिला अधिकाऱ्याने हे बँक खाते आपले नसल्याचे सांगितले. यावेळी समोरील अधिकाऱ्याने मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात संदीपकुमार नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या चौकशीतून नाव समोर आल्याची माहिती दिली. त्यामुळे तुमची चौकशी होणार असून चौकशीनंतर अटकेची कारवाई होणार आहे. त्यामुळे तिने चौकशीला सहकार्य करावे, नाही तर घरी येऊन अटक केली जाईल, अशी धमकी दिली.
घाबरलेली महिला समोरचा अधिकारी सांगेल त्याप्रमाणे करू लागली. तिने स्वत:च्या खात्यामध्ये असलेली रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यावर वर्ग केली. तोतया अधिकाऱ्याने महिलेला एफडी आणि आरडीदेखील तोडण्यास भाग पाडून रक्कम वळती करण्यास सांगितले. ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत तब्बल चार कोटी ६२ लाख रुपये वळते करण्यात आले. चौकशी पूर्ण होताच ती रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असल्याचे सांगितले.
संपर्क तोडल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड
मात्र या तोतया अधिकाऱ्याने तिला नंतर संपर्क साधला नाही किंवा तिचे पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले नाही. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी नरेंद्र सिन्हा आणि गुंजन दिनेशचंद्र या दोघांना अटक केली.