• Mon. Mar 16th, 2026

    मुंबईकर घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, स्वस्तात घराच्या आमिषाने 17 लाखांचा गंडा

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    मुंबईकर घटस्फोटित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, स्वस्तात घराच्या आमिषाने 17 लाखांचा गंडा

    मुंबई

     घटस्फोटामुळे अस्थिर झालेले आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी मुलुंडच्या एका महिलेने विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवरून जोडीदार निवडला. पुन्हा संसार थाटणार, या आनंदात असलेल्या महिलेचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. संसाराची स्वप्ने ज्या जोडीदारासोबत पाहिली जात होती, त्याने विश्वासघात केला. सरकारच्या निर्भया फंडातून घटस्फोटित महिलांना स्वस्तात घर घेऊन देतो सांगत या वाग्दत्त वराने १७ लाखांचा गंडा घातला.

    काय आहे प्रकरण?

    मुलुंडच्या पूर्वेकडे राहणारी मेघना ही ग्राफिक डिझायनर आहे. सन २०१२ मध्ये तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती तणावात होती. घरचेही पुन्हा लग्न करण्यासाठी तिच्या मागे लागले होते. अखेर तीन-चार वर्षांपूर्वी विवाह जुळविणाऱ्या एका वेबसाइटवर तिने नोंदणी केली. तेव्हापासून तिचा पतीचा शोध सुरू होता. सप्टेंबर २०२३ मध्ये विराज भोसले नावाच्या तरुणाने तिला ‘रिक्वेस्ट’ पाठवली. त्याचे प्रोफाइल पाहून मेघनाने ‘रिक्वेस्ट’ स्वीकारली. अधिक माहितीसाठी मेघनाने विराजला फोन केला. त्याने वडील आयपीएस अधिकारी असून आई आणि बहीण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले. विराजने तो स्वतः राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत सामाजिक क्षेत्रात काम करत असून स्वतःची एक स्वयंसेवी संस्था चालवत असल्याचे सांगितले. मेघना त्याच्या बोलण्याने प्रभावित झाली आणि तिने त्याच्यासोबत बोलणे सुरूच ठेवले.

    स्वस्तात घर मिळवून देण्याचं आमिष

    मेघनाचा विश्वास बसल्याचे पाहून विराजने आपली मंत्रालयात ओळख असून सरकारी योजनेच्या निर्भया फंडातून तुला स्वस्तात घर मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. मात्र त्यासाठी बँकेत कर्ज खाते उघडावे लागेल. त्यानुसार मेघनाने खाते उघडून त्यावर १७ लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले. विराजने ही रक्कम त्याला देण्यास सांगितले. त्याबदल्यात तो घराचे ताबापत्र देणार होता. मात्र पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी घर मिळत नसल्याने आणि विराज टाळत असल्याने मेघनाला संशय आला.

    तिने विराजकडे पैसे मागितले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे न दिल्यास तक्रार करेन, असे मेघनाने सांगताच कुठेही तक्रार करायची तिथे माझ्या ओळखी असून मी कुठूनही बाहेर येईन, असे उलट उत्तर विराजने देताच मेघनाने नवघर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *