पुणे: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील दोन तृतीयांश खासदारांनी बंड करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते. ‘ऑपरेशन टायगर’नुसार उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा हादरा देण्यासाठी विविध बैठका घेण्यात आल्या. अखेर आता हे ऑपरेशन यशस्वी होणार, हे जवळपास निश्चित झालं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या शिवसेनेतील कोणीही उघडपणे याबाबतची माहिती देण्यास तयार नव्हतं. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे मावळमधील खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली आहे.
ऑपरेशन टायगरविषयी माहिती देताना श्रीरंग बारणे म्हणाले की, “आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी मागील वर्षभरापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांसोबत आमची चर्चा होत होती. उबाठा गटाच्या नेत्यांनाही याबाबतची माहिती होती, पूर्वकल्पना होती. वर्षभरापासून त्यांचे खासदार खदखद व्यक्त करत होते आणि त्यासाठी कालचा दिवस ठरला. कोणकोणत्या खासदारांच्या सह्या झाल्या ते तुम्हाला आज-उद्या कळेल. मला जेवढी माहिती आहे त्यानुसार, उबाठा गटाच्या खासदारांनी एक स्वतंत्र गट स्थापन केला आहे.”
श्रीरंग बारणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांनी केलेल्या प्रक्रियेविषयीही माहिती दिली आहे. “स्वतंत्र गट स्थापनेसाठी नियम असा आहे की दोन तृतीयांश खासदारांनी एकत्र येऊन गट स्थापन करायचा, त्यानंतर लोकसभेचे सभापती त्यांना मान्यता देऊ शकतात. लोकसभा सभापतींच्या मान्यतेनंतर स्वतंत्र गट अस्तित्वात येतो. असा गट अस्तित्वात आल्यानंतर या गटाचं अस्तित्व टिकवायचं की दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचं, हा त्या खासदारांचा अधिकार असतो. माझ्या माहितीप्रमाणे उबाठा गटाच्या खासदारांनी गट स्थापन केला असून त्यावर सह्या केलेल्या आहेत, लोकसभा सभापतींनी मान्यता दिल्यानंतर हा गट अस्तित्वात येईल,” असं बारणे यांनी म्हटलं आहे
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षनेतृत्वाने ताकद दिली नसल्याची खदखद उबाठा गटाचे खासदार व्यक्त करत होते, असा दावाही श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
शेवटच्या क्षणाला फोन लावणं हा त्यांचा स्वभावच…; शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला
ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरेंना शेवटच्या क्षणाला फोन लावून मनधरणी करण्याची सवयच आहे. आम्ही जेव्हा उठाव केला होता, तेव्हा आम्हालाही ५० फोन आले होते. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, मनधरणी करून काहीही फायदा नाही,” असा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला. तसेच, संजय राऊत यांच्या शिवीगाळीमुळेच या खासदारांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले असल्याचा दावाही त्यांनी केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा