• Thu. Mar 12th, 2026

    आईवरून शिवी दिल्याचा राग, तरुणाचं नको ते धक्कादायक कृत्य

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2026
    आईवरून शिवी दिल्याचा राग, तरुणाचं नको ते धक्कादायक कृत्य
    पिंपरी-चिंचवड
     पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेकदा गुन्हेगारी घटना समोर येताना दिसत आहेत. आता तर अतिशय क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. संबंधित घटना ही पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. अनेक तरुणांमध्ये आता रागावर कोणतंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. थोडाही संयम त्यांच्यात दिसत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. कारण तशी घटनाच पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मरेकऱ्याला अटकदेखील केली आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. सर्वसामान्य नागरिकाचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सनी चव्हाण या आरोपीला अटक केली आहे. संतोष पवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पवार आणि सनी चव्हाण हे दोघेही सोमाटणे फाटा परिसरात जुन्या पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानात मुलं खेळत असलेला क्रिकेट सामना पाहत बसले होते. दोघेही एकाच कट्ट्यावर बसले होते. विशेष म्हणजे, हे दोघे एकमेकांना ओळखत नव्हते आणि पूर्णपणे अनोळखी होते.

    दरम्यान, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान मयत संतोष पवार याने आरोपी सनी चव्हाणला आईवरून शिवीगाळ केल्याने चव्हाण संतप्त झाला. रागाच्या भरात सनी चव्हाणने तिथेच असलेल्या दगडाने संतोष पवारच्या डोक्यावर जोरदार घाव घालून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सनी चव्हाणला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

    संतोष पवार यांच्या हत्येमागे ठोस कारण अद्याप समोर आलेलं नसून, केवळ आईवरून शिवी दिल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह सवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed