• Mon. Sep 14th, 2026

क्लासवरुन घरी परतताना विद्यार्थिनीवर रिक्षात अत्याचार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

ByMH LIVE NEWS

Feb 1, 2026
क्लासवरुन घरी परतताना विद्यार्थिनीवर रिक्षात अत्याचार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

बीड 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने आपल्यावर चालत्या रिक्षात अत्याचार झाल्याचा बनाव रचल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता, ही संपूर्ण कथा काल्पनिक असल्याचं समोर आलं असून यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

असा घडला प्रकार घडला होता

26 नोव्हेंबर 2025 रोजी या तरुणीने तक्रार दिली होती की, दुपारी 4च्या सुमारास क्लासवरून घरी परतत असताना रिक्षा चालकानं तिला नगर रोडवरील एका निर्जन ठिकाणी नेलं. तिथे रिक्षातील एका सहप्रवाशाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिकार केल्यावर तिला मारहाण केली. या गंभीर तक्रारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरले होतं.

पोलिसांना आला होता संशय

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. मात्र, तपासादरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे पोलिसांच्या नजरेस आले पोलिसांनी मार्गावरील सीसीटीव्ही तपासले असता, तरुणी सांगितलेल्या वेळेत रिक्षातून थेट आपल्या घराच्या दिशेने जाताना दिसली. तरुणीला वारंवार विचारूनही तिला नेमके घटनास्थळ सांगता येत नव्हते. पोलिसांनी 10 ते 15 रिक्षा चालकांची कसून चौकशी केली, मात्र कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही.

अत्याचाराचा बनाव का रचला?

पोलिसांनी जेव्हा तरुणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा तिने हा प्रकार काल्पनिक असल्याचं कबूल केलं. तिने दिलेल्या जबाबानुसार ‘काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील एका पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची बातमी मी वाचली होती. घरी जाताना माझ्या डोक्यात सतत तोच विचार सुरू होता. घरी गेल्यावर मी भीतीपोटी आणि भावनिक भरात घरच्यांना खोटेच सांगितलं की, माझ्यासोबत असा प्रकार घडला आहे. माझ्या रडण्यामुळे घरच्यांचा विश्वास बसला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले’.

प्रभावाखाली येऊन तरुणीने बनाव केला

शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी सांगितलं की, तक्रार प्राप्त होताच आम्ही तातडीने गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवली होती. मात्र तांत्रिक पुराव्यांवरून हे स्पष्ट झालं की, असा कोणताही प्रकार घडलेला नाही. केवळ एका बातमीच्या प्रभावाखाली येऊन तरुणीने हा बनाव रचला होता. एका खोट्या तक्रारीमुळे पोलीस दलाचा अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च झाली. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed