रायगड किल्ल्यावरून परतणाऱ्या शिवभक्त पर्यटकांची खासगी बस पुनाडे घाटात पलटी झाली. या भीषण अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, बसचे ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील अहिल्यानगर परिसरातील १७ प्रवासी किल्ले रायगड दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून सायंकाळच्या सुमारास ही खासगी बस पुण्याच्या दिशेने निघाली असताना पुनाडे घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले आणि काहीजण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीस धाव घेतली. जखमी प्रवाशांना तात्काळ पाचाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर १३ प्रवाशांवर पाचाड येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत.
Nashik Farmers Protest : सर्वात मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या ‘या’ मागण्या मान्य, नाशिकहून निघालेलं लाल वादळ उद्या थंड होणार?
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पाचाड ग्रामस्थ रघुवीर देशमुख यांनी प्राथमिक माहिती देताना, बसचे ब्रेक फेल झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच महाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, पुनाडे घाटातील धोकादायक वळणे आणि अरुंद रस्ता यामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होत असतानाही घाटरस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः पर्यटन हंगामात रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी बस व ट्रॅव्हल्सची वर्दळ असते. त्यामुळे वाहनांची तांत्रिक तपासणी, वेगमर्यादा आणि घाटरस्त्यांवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Jitendra Awhad : ‘हाथी चले अपनी चाल कुत्ते भोंके हजार’, सहर शेखच्या आव्हानावर जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
या अपघातामुळे काही काळ पुनाडे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने बस बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी हा प्रकार गंभीर इशारा देणारा असल्याचे बोलले जात आहे.
