उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात माँसाहेबांच्या (मीनाताई ठाकरे) योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “माझी मा समयीच्या वातीसारखी होती, जी स्वतः जळत घर उजळून टाकत होती. प्रबोधनकारांची सून आणि शिवसेनाप्रमुखांची पत्नी म्हणून घर सांभाळताना तिने आम्हाला बाहेरच्या वादळाची जाणीवही होऊ दिली नाही. शाळेत जायचा कंटाळा आला की मी बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो आणि तेही मला समजून घ्यायचे,” अशा शब्दांत त्यांनी घराण्यातील नात्यांचे पदर उलगडले.
“घराणेशाहीचा अभिमान आहे!”
विरोधकांकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले. “ठाकरे नाव पुसायला अनेक जण मैदानात उतरले आहेत, पण ते नाव पुसलं जात नाहीये. आम्ही ज्या घराण्यात जन्मलो, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्यांना मी काही करू शकत नाही. आम्हाला ही परंपरा लाभली हे आमचं भाग्य आहे,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
गद्दारीचा शाप आणि इतिहास
महाराष्ट्राच्या इतिहासाचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, “गद्दारीचा विषय आजचा नाही, तो पूर्वापार चालत आलेला एक शाप आहे. जेव्हा शत्रूला विजय अशक्य वाटतो, तेव्हाच तो गद्दारांची मदत घेतो. जर भगव्याशी गद्दारी झाली नसती, तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता.”
झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा
शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासाची तुलना एका महाकाय वृक्षाशी करताना ते भावूक झाले. “एक मोठं झाड असतं, ज्यावर अनेक पिढ्या वाढतात. पण जेव्हा एखादा व्यापारी ते झाड कापायला येतो, तेव्हा त्या कुऱ्हाडीचा दांडा त्याच झाडाच्या लाकडाचा असतो, याचंच जास्त दुःख होतं. आज कुऱ्हाडीचे दांडेच आपल्या मुळावर घाव घालत आहेत,” अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी बंडखोर नेत्यांवर केली.
