• Wed. Jun 10th, 2026

    सगळे पक्ष एकाएकी ‘फिरले’, ठाकरेंकडे सातच शिलेदार उरले; शिंदे पितापुत्रांचा भाजपला धोबीपछाड

    सगळे पक्ष एकाएकी ‘फिरले’, ठाकरेंकडे सातच शिलेदार उरले; शिंदे पितापुत्रांचा भाजपला धोबीपछाड

    कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर पदासाठी शिंदेसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या ५ नगरसेवकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ४ फुटीर नगरसेवकांना आपल्यासोबत घेत ६२ चा आकडा पार केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु झालं आहे. दोन्ही पक्षांनी युती करुन निवडणूक लढवली. शिंदेसेनेला ५३, भाजपला ५० जागा मिळाल्या. महायुतीला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. पण दोन्ही पक्ष महापौर पदासाठी आग्रही आहेत. त्यादृष्टीनं संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये शिंदेसेनेला मोठं यश मिळालं आहे.

    कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. आज सकाळी शिंदेसेनेचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे नवी मुंबईतील बेलापूरला पोहोचले होते. सेनेच्या ५३ नगरसेवकांना घेऊन शिंदे त्यांचा गट स्थापन करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी तिथे मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटीलही दाखल झाले. त्यांच्या सोबत मनसेचे ५ नगरसेवकदेखील होते. मनसेच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी पाटील कोकण भवनला गेले होते.

    आपापल्या पक्षांच्या नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी पोहोचलेल्या श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांची बैठक झाली. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनसे नं कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मनसे आणि शिवसेना उबाठा यांनी सोबत निवडणूक लढवली होती. ठाकरे बंधू महायुतीच्या विरोधात लढले होते. पण आता मनसेनं शिंदेसेनेलाच पाठिंबा जाहीर केला आहे.

    मनसे सोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ४ फुटीर नगरसेवकांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदेसेनेचे ५३, मनसेचे ५, ठाकरेसेनेचे ४ फुटीर नगरसेवक असं एकूण ६२ चं संख्याबळ शिंदेसेनेकडे आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंदेखील शिंदेसेनेला समर्थन दिलं आहे. त्यांचा १ नगरसेवक आहे. २ नगरसेवक असलेल्या काँग्रेसनं शिंदेसेनेला बाहेरुन पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदेसेनेचं संख्याबळ ६५ वर गेलं आहे.

    कल्याण-डोंबिवलीत महापालिकेतील एकूण सदस्यसंख्या १२२ इतकी आहे. बहुमतासाठी ६२ चा आकडा गाठणं गरजेचं आहे. श्रीकांत शिंदे यांनी जुळवाजुळव करत हा आकडा पार केला आहे. जवळपास सगळेच पक्ष एकाएकी शिंदेसेनेच्या बाजूनं फिरले आहेत. उद्धव ठाकरेंचे ११ जण विजयी झाले. त्यातील ७ नगरसेवक ठाकरेंसोबत आहेत. त्यांनी गट स्थापन केला आहे. बाकी सगळ्याच पक्षांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा