कल्याण डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील दोन नगरसेवकांचा पक्षासोबत संपर्क होऊ शकत नाहीय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्या दोन्ही नगरसेवकांना अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी नुकतंच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी सोशल मीडियावर श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचा फोटोदेखील शेअर केला होता. त्यामुळे ठाकरे गट देखील सतर्क झाला आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले दोन नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी नोटीस दिली आहे. ठाकरे गटाची उद्या पक्ष गट स्थापनेबाबत बैठक आहे. या बैठकीला उपस्थित राहावे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास पक्ष विरोधी काम केल्याने पक्षाकडून कारवाई केली जाईल, अशी नोटीस दोन्ही नगरसेवकांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मधूर म्हात्रे यांच्या वडिलांना तर कीर्ती ढोणे यांच्या बहिणीकडे नोटीस सुपूर्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक उद्याच्या बैठकीला खरंच उपस्थित राहतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. “पक्षाचा गट स्थापन करणं आणि गटनेता निवडणं या दोन्ही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्कात नसल्यामुळे आज त्यांच्या घरावर आम्हाला सूचनांचं पत्र लावावं लागलं. त्यांना ज्या काही सूचना होत्या त्या देवाव्या लागल्या”, अशी माहिती ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांनी दिली.
“दोन दिवसांपूर्वी जो फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधल्यानंतरही ते आमच्या संपर्कात आले नाहीत. ते पक्षाच्या सभेला किंवा बैठकीला उपस्थित न राहण्यास त्यांच्यावर पुढे अपात्रतेची कारवाई पक्षातर्फे करण्यात येईल”, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिला.
