Shivsena News: मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राजधानीत कोणाचा महापौर होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत सत्तास्थापनेसाठी कोण कोणासोबत जाणार, याबाबत उत्सुकता असतानाच आता आणखी एका शहरात होत असलेल्या संभाव्य युतीने खळबळ उडवून दिली आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ जागांचे निकाल हाती आले आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टीने मुसंडी मारत ३५ जागा जिंकल्या. एमआयएमला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेनेने (शिंदे गट) १८ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठे नुकसान भाजपचे झाले असून, २४ जागा लढवून त्यांच्या पदरात केवळ २ जागा पडल्या आहेत.
सत्तेचे गणित असे असेल?
बहुमतासाठी मालेगावमध्ये ४३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या युतीकडे एकूण ४० (३५+५) जागा आहेत. बहुमतासाठी त्यांना अजून केवळ ३ जागांची गरज आहे. काँग्रेसकडे तीन जागा आहेत . काँग्रेसला सोबत घेऊन इस्लाम पार्टीला सत्ता स्थापन करता येईल. मात्र विकासासाठी राज्यातील सत्ताधारी पक्षासोबत असणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत, राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (१८ जागा) आणि आसिफ शेख यांची इस्लाम पार्टी एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निकालानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी केलेला एकत्रित जल्लोष आणि नेत्यांनी एकमेकांचे केलेले अभिनंदन, हे नव्या युतीचे संकेत मानले जात आहेत. जर इस्लाम पार्टी आणि शिवसेना एकत्र आले, तर हा आकडा ५८ वर पोहोचेल, जो बहुमतापेक्षा कितीतरी अधिक आहे. पण, या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एमआयएम आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही ‘अकल्पित’ युती आकारास येणार का? की मालेगावात पुन्हा काही नवी समीकरणे पाहायला मिळणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
