मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेत तपोवन येथील वृक्षतोडीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांची आज नाशिकमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
“ही जी जागा आहे, या जागेमध्ये साधुग्राम आपण करतोय. 1993 पासून ही जागा साधुग्रामसाठी आरक्षित आहे. पण 2003, 2015 मध्येही इथे साधुग्राम केला. खरं म्हणजे 2002 साली महापालिकेने ठराव केला होती की, ही जागा मिळवायची. तेव्हाच्या 7 कोटी रुपयात ही जागा महापालिकेला मिळणार होती. माझ्याकडे साधूग्रामच्या जागेचा गूगल मॅप आहे. 2014-15 च्या गूगल मॅपमध्ये झाडं दिसत नाहीत. पण 2024-25 च्या गूगल मॅपमध्ये झाडे दिसतात”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“आपण महाराष्ट्रात 50 कोटींच्या वृक्षरोपणाचा संकल्प केला. आपण ज्यावेळेस वृक्षरोपणासाठी जागा शोधून काढल्या, त्यावेळी नाशिक महापालिकेत आपली सत्ता होती. आपल्या लोकांनी निर्णय घेतला की, या ठिकाणी वृक्षारोपण करायची. तिथे काही जुने वृक्ष आहेत, काही झाडे झुडपे आहेत, तर काही आपण वृक्षरोपण केलेली आहेत. पण मी तेवढंच सांगून थांबणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
BMC All Candidate List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागात कोणाकोणात लढत? वाचा A टू Z यादी
“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन गेले. या महापालिकेत ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं, त्यावेळी 16 एप्रिल 2016 या दिवशी ठराव झाला होता, त्यावेळी राज ठाकरे आपली सत्ता होती, आपले महापौर होते, आपली महापालिका होती. त्या ठिकाणी ठरावात म्हटलं होतं की, 54 एकर जागा विनावापर पडून आहे. त्यावर खुले वहानतळ, मनोरंजन, सर्कस, खेळाचे मैदान, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, चौपाटी, नर्सिंग कॉलेज या सगळ्यांकरता उपयोग करुन त्यातून पैसे महापालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता राज ठाकरे तुम्ही हा ठराव केला. त्यानंतर आमची सत्ता आली. आम्ही त्या जागेचा कमर्शियल वापर न करता झाडे लावली आणि त्या जागेला हिरवेगार केलं”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आम्हाला कुठली मोठी झाडे तोडायची नाही. काही झुडपे आहेत, ती तोडायची आहेत. पण त्याही संदर्भात उच्च न्यायालयात केस चालू आहे. उच्च न्यायालाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मी मंत्री गिरीश महाजन यांचं अभिनंदन करेन, त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला, असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.
