माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जलील सुखरुप बचावले आहेत. या हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांनी बड्या नेत्यांची थेट नावे घेत गंभीर आरोप केले आहेत.
“लोकशाही आणि शांततापूर्ण वातावारणात निवडणूक झाली तर आम्हीदेखील तशीच निवडणूक लढू. पण काही गुंड असं समजत आहेत की, शहारत गुंडगिरी करुन विरोधकांना कमजोर करु. हे लोकं तीच आहेत जी भाजप मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बोलण्यावर हा सगळा खेळ खेळत होते. मी आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे, भाजपचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट यांचं नाव घेत आहेत. त्यांनी पाळलेले हे कुत्रे आहेत”, असा मोठा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
“हल्ला करणाऱ्यांच्या हातात फायटर,चाकू होते. आमच्या एका मुलाला फायटरने मार लागला आहे. हल्ला करणारे पूर्ण गाडी फोडण्याच्या तयारीत होते. जवळपास 100 मुलं गाडीच्या पाठीमागून येत होते. आम्ही या घटनेची पूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. ते पोलिसांनादेखील धक्काबुक्की करत होते. आता काय करणार त्याची वाट बघतोय. पोलिसांनी घटनास्थळावरचा सीसीटीव्ही फुटेज काढून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. पोलीस कशाप्रकारे कारवाई करतात, हे आम्हाला बघायचं आहे”, असं जलील म्हणाले.
“ते झुंडमध्ये आले होते. त्यांना असं वाटलं की, आम्ही या हल्ल्यानंतर पुढची रॅली करणार नाही. आमच्या पक्षाचे लोक घरी बसतील. मी पोलिसांना सांगितलं की, मी पुढे चाललो आहे. माझी रॅली आहे. त्या रॅलीत मी पुढे जाणार आहे. राडा झाला तर होऊ द्याना. आम्ही काय गप्प बसणार आहोत का? त्यांना डोक्यावर बसवायला बाहेर येणार आहोत का? जे काही व्हायचं आहे ते होऊ द्या”, असं जलील यांनी सांगितलं.
“राजकारणात अशाप्रकारच्या किरकोळ घटना होतच राहतात. तुम्हाला असं वाटतं ते नाराज होते, पण जितके नाराज लोक होते ते सर्व आज ओवैसींच्या सभेत दिसणार आहेत”, असादेखील दावा जलील यांनी केला.
अतुल सावे काय म्हणाले?
दरम्यान, मंत्री अतुल सावे यांनी इम्तियाज जलील यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “माझी इम्तियाज जलील यांना विनंती आहे की, त्या कार्यकर्त्यांपैकी एक जरी कार्यकर्ता माझा कार्यकर्त्यांपैकी असल्याचं दाखवावं. ते एमआयएमचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक आहेत. ह्यांनी पैसे घेऊन तिकीट वाटले, असा त्यांचा आरोप. त्या लोकांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे. मी केलेला नाही. ते गुंड होते तर मग मागच्यावेळी त्यांना का तिकीट दिले? पैसे घेऊन तिकीट देतात म्हणून तुमच्यावर हल्ला करत आहेत. माझा त्यांच्याशी काय संबंध? आम्ही तर त्यांच्या भागात निवडणूकही लढवत नाही आहोत. त्यांनी हे बोलण्याआधी स्वत:चं आत्मपरिक्षण करावं. ते त्यांचेच नगरसेवक आणि कार्यकर्ते आहेत. हल्ला करणाऱ्यांना अटक करा. तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांना अटक करा”, अशी भूमिका अतुल सावे यांनी मांडली.
